विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशी विमान कंपन्यांनी विमानांमध्ये पाश्चात्य संगीतापेक्षा भारतीय संगीताला प्राधान्य द्यावे, अशी विनंती नामांकित गायक व संगीतकारांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन केली.Indian music should be given priority in airplanes over western music, demand of renowned singers and musicians to Jyotiraditya Shinde
राज्यसभेतील खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. पं. संजीव अभ्यंकर, पं. शौनक अभिषेकी, उस्ताद वसीफुद्दीन डागर, पदमश्री रिटा गांगुली, गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील, संगीतकार अन्नू मलिक, संगीतकार-गायक कौशल इनामदार आदी संगीत क्षेत्रातील दिग्गज ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते.
शिंदे यांनी गुरुवारी या मंडळींची आयसीसीआरच्या मुख्यालयात येऊन विचारपूस केली. विमानांमधून भारतीय संगीताच्या प्रचार आणि प्रसाराच्या मागणीवर शिंदे यांनी तातडीने कोणतेही आश्वासन दिले नाही. मात्र, जयपूरमध्ये दरवर्षी साहित्यप्रेमींसाठी लिट फेस्ट भरवला जातो, त्याप्रमाणे संगीतक्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन देशभर संगीत महोत्सव भरवला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
अमेरिकन विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये प्रामुख्याने जॅझ संगीत वाजवले जाते. ऑस्ट्रियन विमान कंपन्या मोझार्टच्या सुरावटींना अधिक पसंत करतात. या कंपन्या आपापल्या देशाच्या संगीत आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे भारतीय कंपन्यांनी आपल्या मातीत जन्माला आलेल्या आणि हजारो वर्षांचा वारसा असलेल्या संगीताला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन सहस्त्रबुध्दे यांनी केले.
आयसीसीआरच्या वतीने पं. भीमसेन जोशी व उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ या संगीत दिग्ग्जांच्या नावे गायन आणि वादनासाठी दोन शिष्यवृत्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पद्माश्री मालिनी अवस्थी, उस्ताद वसीफुद्दीन डागर आणि पं. विश्वमोहन भट यांच्या निवड समितीने हंगेरीच्या गॅब्रिएला गरिमा तोथ यांची पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्तीसाठी तर, जर्मनीचे क्रॅस्न विकी यांची उ. मुस्तफा खाँ शिष्यवृत्तीसाठी निवड केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App