Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India : आसाम, पुदच्चेरी भाजपकडे, तमिळनाडू द्रमुककडे, केरळ डाव्यांकडे.. पण बंगालमध्ये गौडबंगाल!

बंगालमध्ये आठवा टप्प्याचे मतदान होताच एक्झिट पोल्सच जाहीर झाले. तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डावे, आसाम भाजपकडे, पुदुच्चेरीमध्ये प्रथमच एनडीए… हे अपेक्षेप्रमाणेच आहे, पण ज्याची सर्वाधिक उत्सुकता आहे, त्या बंगालमधील गौडबंगालाने चांगलाच थरार निर्माण झाला आहे. चार राज्यांबाबत सर्वच एक्झिट पोल्स एकमताने बोलत आहेत, पण अपवाद फक्त पश्चिम बंगालचा. हे पोल्स पूर्णपणे दुभंगलेले आहेत, पण त्यांचा सरासरी कल ममता बॅनर्जी यांच्याकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, तसे झाले तर ममता बॅनर्जी यांना काठावरच बहुमत मिळू शकते. याशिवाय दोन शक्यता आहेत. एक म्हणजे त्रिशंकू स्थिती निर्माण होणे किंवा दुसरीकडे भाजपने घवघवीत यश मिळविणे. Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बंगालमध्ये आठवा टप्प्याचे मतदान होताच एक्झिट पोल्सच जाहीर झाले. तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डावे, आसाम भाजपकडे, पुदुच्चेरीमध्ये प्रथमच एनडीए… हे अपेक्षेप्रमाणेच आहे, पण ज्याची सर्वाधिक उत्सुकता आहे, त्या बंगालमधील गौडबंगालाने चांगलाच थरार निर्माण झाला आहे. चार राज्यांबाबत सर्वच एक्झिट पोल्स एकमताने बोलत आहेत, पण अपवाद फक्त पश्चिम बंगालचा. हे पोल्स पूर्णपणे दुभंगलेले आहेत, पण त्यांचा सरासरी कल ममता बॅनर्जी यांच्याकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, तसे झाले तर ममता बॅनर्जी यांना काठावरच बहुमत मिळू शकते. याशिवाय दोन शक्यता आहेत. एक म्हणजे त्रिशंकू स्थिती निर्माण होणे किंवा दुसरीकडे भाजपने घवघवीत यश मिळविणे. आजपर्यंतचा एक्झिट पोल्सचे अंदाज संमिक्ष स्वरूपाचे आहेत. त्यामुळे २ मे रोजी प्रत्यक्षात जनमताचा कौल कोणता आहे, याची उत्सुकता असेल.

 

*  बंगाल : खेळ कोणाचा संपेल? दीदी की ‘दादा’चा?

बंगालवरून एक्झिट पोल्स पूर्णपणे गोंधळलेले दिसत आहेत. काहींनी तृणमूल काँग्रेसला तर काहींनी भाजपला विजय दाखविला आहे, पण अगदी काठावरच. त्यामुळे जनतेचा नेमका कौल काय असेल, यावरून जबरदस्त उत्सुकता ताणली आहे. बंगाल जिंकण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले आहे, पण ममतांच्या लोकप्रियतेला पराभूत करण्याइतपत भाजपचे प्रयत्न पुरेसे आहेत, यावर शंका निर्माण करणारे एक्झिट पोल्सचे अंदाज आहेत. सर्वच एक्झिट पोल्सची जर सरासरी काढली तर काठावरच्या बहुमताने ममताच पुन्हा सत्तेवर येतील.

 


*  आसाम : भाजपा नक्की, मुख्यमंत्री कोण?

बहुतेक सर्वच एक्झिट पोल्समध्ये आसाममध्ये भाजप पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळविणार असल्याचे दिसते आहे. १२६ पैकी भाजपला ७५-८५ जागा मिळतील, असा सरासरी अंदाज आहे. प्रत्यक्षात तसे झालेच तर फार मोठा चमत्कार असेल. कारण काँग्रेस आणि मुस्लिम पक्ष असलेल्या बद्रुद्दिन अजमल यांच्या एआययूडीएफ यांच्या युतीमुळे भाजप अडचणीत येईल, असा अंदाज होता. मात्र, लोकप्रिय योजनांमुळे भाजपचा विजय सुकर होऊ शकतो. मात्र, मुख्यमंत्री कोण असेल, या यक्षप्रश्न भाजपला सोडवावा लागेल. एकीकडे लो प्रोफाइल व लोकप्रिय सर्बानंद सोनोवाल आणि दुसरीकडे आक्रमक आणि जबरदस्त लोकप्रिय हेमंता बिस्वा सरमा यांच्यात कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


*  केरळ : सबकुछ विजयन; राहुल गांधींना दणका

राहुल गांधी खासदार असलेल्या आणि लोकसभेच्या २०पैकी तब्बल १९ जागा जिंकलेल्या काँग्रेसला केरळमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. सर्वच एक्झिट पोल्सनी डावे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या जबरदस्त विजयाची द्वाही फिरविली आहे. काँग्रेसला दणका बसला असताना भाजपच्या वाट्यालाही पुन्हा निराशा येण्याची शक्यता आहे. दोन ते तीन जागांवर भाजपची बोळवण होईल, असे चित्र आहे.


*  तमिळनाडू : द्रमुकचे वादळ; स्टॅलिन नवे करूणानिधी!

द्रमुकचा विजय सर्वांनाच अपेक्षित होता, पण सर्वच एक्झिट पोल्सनी द्रमुकला जवळपास दोन तृतीयांश बहुमत दिले आहे. प्रत्यक्षात तसे झाल्यास द्रमुकचे वादळ घोंघावेल आणि त्यामध्ये अण्णाद्रमुक व भाजप युतीचा पालापाचोळा होईल. या संभाव्य विजयाने संभाव्य मुख्यमंत्री स्टॅलिन हे द्रमुकचे भीष्म पितावह एम. करूणानिधी यांची जागा घेतील.


*  पुदुच्चेरी : तमिळनाडूचे प्रवेशद्वार भाजपला किलकिले

तमिळनाडूच्या किनारयावर वसलेले हा नितांतसुंदर केंद्रशासित प्रदेश कदाचित भाजपचे स्वागत करेल, असा एक्झिट पोल्सचा अंदाज आहे. तीसपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए १६ ते २० जागा मिळवू शकते. प्रत्यक्षात तसे घडल्यास काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटेल. दुसरीकडे कदाचित मुख्यमंत्रीपद जरी भाजपला मिळाले नाही, तर तमिळनाडूसाठीचे दरवाजे भाजपसाठी किलकिले होते. त्यामुळे या राज्यातील सत्तेचे भाजपला अधिक अप्रूप असेल. अखिल भारतीय एनआर काँग्रेसचे एन. आर. रंगास्वामी मुख्यमंत्री होण्याचा अंदाज आहे.

Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India