नाशिक : हिंदूंना शिव्या, मुस्लिमांसाठी ओव्या; यमुनेच्या फेसावर काँग्रेसच्या तरतील का नौका??, असे विचारण्याची वेळ काँग्रेस नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी जी राजकीय वक्तव्ये आणि वर्तणूक केली. त्यातून वर उपस्थित केलेला सवाल समोर आला. Congress
एकीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना 27 जानेवारी रोजी काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महूमध्ये जय गांधी जय भीम आणि जय संविधान रॅली घेतली. त्यामध्ये राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत केलेली सगळी भाषणे जशीच्या तशी रिपीट केली. त्यांनी घटनेचे लाल किताब हातात नाचवले.
पण काँग्रेसचे वयोवृद्ध आणि अनुभवी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शाह यांच्यावर शरसंधान साधताना परस्पर हिंदु धर्मीयांना डिवचले. गंगेमध्ये डुबकी मारून तुमची पापे धुतली जातील का आणि जनतेची गरिबी हटेल का??, असा सवाल खर्गे यांनी अमित शहा यांना केला. यात अमित शाह यांना राजकीय प्रश्न विचारून डिवचण्यात काही वेगळे नव्हते, पण त्यासाठी गंगेत डुबकी मारण्याचा संदर्भ देऊन हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे देखील कारण नव्हते. पण ते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने केले. काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांनी तर्कटी बुद्धीने खर्गेंच्या वक्तव्याचे समर्थन केले, पण त्यामुळेच भाजपला काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळाली. भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकून घेतले.
ज्या प्रयागराजच्या महा कुंभमेळ्यात अमित शाह यांनी त्रिवेणी संगमात डुबकी मारली, त्याच कुंभमेळ्यात सर्व संतांनी एकत्र येऊन धर्म संसद भरवली. त्यामध्ये सगळ्यांनी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम अंमलात आणायची मागणी केली. त्याचा आराखडा मोदी सरकारला सादर करायची तयारी दर्शवली. मात्र सनातन हिंदू बोर्ड अधिनियमाचा विषय काँग्रेसच्या नेत्यांना खटकला. काँग्रेसचे प्रवक्ते माजी खासदार उदित राज यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. सनातन धर्म संसद मनुस्मृति मानते. त्यामुळे ती मूळातच घटना विरोधी आहे आणि त्यांनी सादर केलेला हिंदू बोर्ड अधिनियम देखील घटनाबाह्य आहे. त्यामुळे तो अंमलात येऊ शकत नाही, असा दावा उदित राज यांनी केला.
एकीकडे मल्लिकार्जुन खर्गे आणि उदित राज यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी हिंदूंच्या काही विशिष्ट गोष्टींवर आक्षेप घेतला, त्याचवेळी जम्मू कश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सज्जाद गणी लोन यांनी मुस्लिम वक्फ बोर्ड भारतीय संसदेच्या कक्षेपलीकडची बाब असल्याचा दावा केला. वक्फ मध्ये सुधारणा करणे हा मुस्लिमांसाठी धार्मिक विषय आहे. त्यावर मुस्लिम समाज स्वतंत्रपणे निर्णय घेईल. त्यामध्ये भारतीय संसदेने लक्ष घालू नये, असे सज्जाद गणी लोन म्हणाले. त्यांना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांनी पाठिंबा दिला.
या सगळ्या राजकीय वक्तव्यांमधून काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांचा अनुनय सुरू केला. जो काँग्रेससाठी धर्मनिरपेक्षतेचा कायमच तोंडावळा राहिला. त्यातच काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि आम आदमी पार्टीच्या काही नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यामध्ये निघत अब्बास सारख्या भाजपच्या महिला प्रवक्त्याचा समावेश होता. यातून काँग्रेसने आपणच मुस्लिमांचे मसीहा असल्याची प्रतिमा दिल्लीत तरी निर्माण करायचा प्रयत्न केला.
दिल्लीत 70 पैकी साधारण 12 ते 16 मतदारसंघांमध्ये मुस्लिम प्रभाव आहे. सध्या तिथे आम आदमी पार्टीचे वर्चस्व आहे. ते मोडीत काढून आपली राजकीय नौका यमुनेच्या फेसावर तरुन नेण्याचा काँग्रेसने प्रयत्न चालवलेला दिसला. कारण अरविंद केजरीवालांच्या राजवटीत यमुनेत पाणी कमी आणि प्रदूषणाचा फेस जास्त आहे. त्यामुळेच काँग्रेसने मुस्लिम अनुनयाद्वारे चालवलेला “खेळ” त्या पक्षाची नौका यमुनेच्या फेसावरून तरेल का??, हा सवाल उत्पन्न झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App