विशेष प्रतिनिधी
वाराणसी : अयोध्यातील रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी हाच दिवस का निवडला?? दुसरे मुहूर्त नव्हते का??, ते का निवडले नाहीत??, असे सवाल देशातल्या अनेक विद्वतजनांनी पुढे आणले. परंतु प्रख्यात वेदविद्वान आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रमुख आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी या संदर्भात वैदिक शास्त्रानुसार स्पष्ट खुलासा केला आहे. Why 22 January only for Ramlalla pran pratishtha in Ayodhya?
श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट कडून स्वामी गोविंद गिरी देव यांनी गणेशशास्त्रींना पत्र लिहून श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तीन मुहूर्त काढून मागितले होते. त्यातही प्रामुख्याने 2024 च्या जानेवारीच्या आतलाच मुहूर्त त्यांनी मागितला होता. त्यानुसार 22 जानेवारीचा मुहूर्त ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने सर्वोत्तम निघाला. बाकीचे माघ, फाल्गुन आणि चैत्र महिन्यातील मुहूर्त देखील पाहण्यात आले. परंतु त्यावेळी अग्निबाण, मृत्युबाण, चोरबाण असे बाण विशिष्ट मुहूर्तांवर असल्याने ते दोषास्पद मुहूर्त निघाले.
22 जानेवारी 2024 रोजी पौश शुद्ध द्वादशी या दिवशी या विशेष तिथीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12.29.8 ते 12.30.32 पर्यंत असेल. हा 84 सेकंदांचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. या काळात मृगाशीर्ष नक्षत्र असेल.
ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात अभिजीत मुहूर्तावरच झाला होता. सोमवार, 22 जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजीत मुहूर्ताचा सर्वोत्तम योग आहे. अशा स्थितीत, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12.11 पासून सुरू होईल आणि 12.54 पर्यंत चालेल. त्यामुळेच श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी हीच तारीख निवडण्यात आली आहे.
कोणत्याही मंदिराचा जीर्णोद्धार साधारण 1 हजार वर्षांनी करावा असे शास्त्र वचन आहे. त्या दृष्टीने मंदिराचे रेखांकन, बांधकाम त्या बांधकाम मधले साहित्य यांचा दर्जा राखावा, असे शास्त्रात सांगितले आहे. अयोध्येतील राम मंदिराचे या शास्त्र वचनानुसारच सर्व काम झाले आहे. मंदिराचे शिखर अथवा अन्य काम बाकी राहिले असले, तरी सनातन धर्मशास्त्रानुसार श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात कोणतीही बाधा नाही.
वेदमूर्धन्य अण्णाशास्त्री वारे यांनी लिहिलेल्या “कर्मकांड प्रदीप” या ग्रंथाच्या आधारे देवप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला आहे. देवप्रतिष्ठापना दोन प्रकारे करता येते. 1. संपूर्ण मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अथवा 2. मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर “कर्मकांड प्रदीप” या ग्रंथात अण्णाशास्त्री वारे यांनी याचे संपूर्ण विधी विधान दिले आहे. उत्तम मुहूर्तावर सर्व देव प्रतिष्ठा प्रयोग झाल्यानंतर कलशारोहण विधी करता येतो. तो संन्याशाच्या हस्ते करावा, असे विधान आहे अन्यथा गृहस्थाच्या हस्ते केल्यास त्या गृहस्थाचा वंश खंड होतो, असे शास्त्रात नमूद आहे.
श्री राम मंदिराची देवप्रतिष्ठापना होण्यापूर्वी लोकव्यवहारानुसार वास्तुशांती देखील होणार आहे. त्याचवेळी सर्व देवतांप्रीत्यर्थ माषभक्तबली, पायसबली आणि अद्भुत ब्राह्मणभोजन ही विधी विधाने देखील होणार आहेत. त्यामुळे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तेथे श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात सनातन वैदिक धर्मशास्त्रानुसार कोणताही दोष नाही.
याशिवाय या शुभ मुहूर्तावर श्री रामलल्लांचा अभिषेक केल्याने प्रभू श्रीराम सदैव मूर्तीच्या आत वास करतील, अशीही श्रद्धा आहे. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते. त्यामुळे रामलल्लांच्या मूर्तीच्या अभिषेकसाठी पौस महिन्यातील द्वादशी तारीख 22 जानेवारी 2024 निवडण्यात आली आहे.
राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठेचा विशेष योग
या विशेष तिथीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12.29 ते 12.30 पर्यंत असेल. या काळात मृगाशीर्ष नक्षत्र असेल.
याखेरीज बाकीचे किमान तीन मुहूर्त बघण्यात आले. परंतु त्या प्रत्येक मुहूर्तावर कोणता ना कोणता बाणदोष आढळल्याने त्या दोषांवर श्री रामलल्लांची प्रतिष्ठापना केल्यास त्यामुळे हानी होण्याची शक्यता ध्यानात आली. अग्निबाणामुळे आग लागून हानी होण्याची शक्यता, मृत्यूबाणामुळे प्रत्यक्ष विधि विधान सुरू असताना लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता ध्यानात घेऊन 22 जानेवारी नंतरचे माघ आणि फाल्गुन मासांमध्ये येणारे मुहूर्त टाळले आहेत.
त्यावेळी तिथीशुद्धी, बाणशुद्धी अथवा पक्षशुद्धी मिळत नव्हती. त्यामुळे 22 जानेवारी नंतरचे माघ आणि फाल्गुन मासांमधले मुहूर्त वेगवेगळे मुहूर्त टाळले आहेत. 22 जानेवारीचा माध्यानकालाचा 84 सेकंदांचा मुहूर्त सर्वोत्तम म्हणून काढून दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more