वृत्तसंस्था
मॉस्को : युक्रेनने ( Ukraine ) रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने युक्रेनच्या स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसच्या हवाल्याने म्हटले आहे की, हा हल्ला रशियाच्या टव्हर भागात झाला आहे. येथे अनेक क्षेपणास्त्रे, बॉम्ब आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे.
अल जझीराच्या म्हणण्यानुसार, ड्रोन हल्ल्यामुळे टोरोपेट्स शहरातील रशियन संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य शस्त्रास्त्र डेपोच्या गोदामात मोठा स्फोट झाला. त्यात इस्कंदर क्षेपणास्त्र प्रणालीसाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे होती. याशिवाय टोचका-यू टॅक्टिकल मिसाईल सिस्टिम आणि अनेक गाईडेड बॉम्ब इथे होते.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर 6 किमी परिसरात आग लागली. या काळात भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने सोशल मीडियावर दावा केला आहे की ज्या ठिकाणी ड्रोन हल्ला झाला त्या ठिकाणी रशियाच्या स्वत:च्या शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रेही होती.
रशियाचा दावा – युक्रेनचे 54 ड्रोन पाडले
युक्रेनच्या इंटेलिजन्स आणि स्पेशल ऑपरेशन फोर्सने मिळून हा हल्ला केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की त्यांनी 54 युक्रेनियन ड्रोन एका रात्रीत पाडले आहेत. मात्र या हल्ल्यात किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
रशियाची राज्य वृत्तसंस्था RIA ने 2018 मध्ये अहवाल दिला की रशियाने क्षेपणास्त्रे, बॉम्ब आणि दारुगोळा साठवण्यासाठी एक मोठा शस्त्रास्त्रांचा डेपो बांधला आहे. तो 2015 मध्ये 326 कोटी रुपयांना तयार करण्यात आला होता.
युक्रेनला रशियात आणखी घुसून हल्ला करायचा आहे
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना आता रशियात घुसून हल्ला करायचा आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ते यासाठी अमेरिकेवरही मदतीसाठी दबाव आणत आहेत. झेलेन्स्की यांनी 31 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की 30 ऑगस्ट रोजी रशियाने खार्किववर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये 6 युक्रेनियन ठार झाले. तर 97 जण जखमी झाले आहेत.
युक्रेनने रशियन एअरफील्ड आणि लष्करी तळांना लक्ष्य केले तरच हे हल्ले थांबवता येतील, असे झेलेन्स्की यांनी म्हटले होते. आम्ही दररोज आमच्या भागीदार देशांशी यावर चर्चा करत आहोत. यासाठी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकेने अद्याप युक्रेनला रशियावर हल्ला करण्यासाठी लांब पल्ल्याची शस्त्रे वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
अडीच वर्षांच्या रशिया-युक्रेन युद्धात 6 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्यांदाच युक्रेनने रशियात घुसून त्याचे कुर्स्क क्षेत्र काबीज केले तेव्हा हे घडले. तेव्हापासून युक्रेन सातत्याने रशियावर हल्ले करत आहे. आरटीच्या रिपोर्टनुसार, 20 दिवसांत युक्रेनच्या हल्ल्यात 31 रशियन नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more