प्रतिनिधी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांबाबत काँग्रेस पक्ष देशभर आंदोलन करत आहे. अदानींकडे 20000 कोटी रुपयांची गुंतवणूक आलीच कशी??, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे, पण त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र नागपूर मधल्या मिट द प्रेस कार्यक्रमात आज वेगळाच सूर लावला. शरद पवारांना ज्यावेळी काँग्रेस मोदी आणि अदानी यांच्या विरोधात आंदोलन करत आहे, याबाबत आपली भूमिका काय??, आपण काँग्रेस नेत्यांना या संदर्भात समजावून सांगणार का??, असा प्रश्न एका पत्रकाराने केला. त्यावर शरद पवारांनी, अदानी मुद्द्यावर काँग्रेसला समजावून सांगणे ही जरा तुमची जास्तच अपेक्षा आहे, अशा शब्दांमध्ये त्या पत्रकाराचा प्रश्न टोलावून लावला. Sharad Pawar differed with Congress over adani issue
शरद पवार म्हणाले, की मी आपण कायमच देशभरात गुंतवणूक येण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी अनेक उद्योगपतींबाबत चांगले बोललो आहे. शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद समूह यांच्या बद्दल मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. तशीच भूमिका मी माझ्या आत्मचरित्रात गौतम अदानींसंदर्भात देखील मांडली आहे. पण काँग्रेस जरी सध्या काही आंदोलन करीत असली तरी मी त्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांना समजावून सांगणे ही जरा तुमची जास्तच अपेक्षा आहे!!, अशा शब्दांत शरद पवारांनी संबंधित पत्रकाराचा प्रश्न टोलवून लावला आहे.
सावरकर मुद्द्यावरही राहुलजींना सुनावले
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात शरद पवारांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना परखड शब्दांत सुनावले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांनी केलेला त्याग, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि त्यांची सामाजिक पुरोगामी भूमिका या बाबी मान्य कराव्याच लागतील, असे शरद पवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सावरकरांच्या राजकीय हिंदुत्वाच्या भूमिकेसंदर्भात वेगळी भूमिका मांडली. सावरकरांच्या हिंदू महासभेच्या धोरणाबाबत आम्ही लोकांनी टीका केली होती. पण ती व्यक्तिगत नव्हती, तर ती धोरणात्मक होती, याकडे शरद पवारांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.
सावरकरांचा त्याग, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक पुरोगामी भूमिका या बाबी मान्य कराव्याच लागतील. त्यांनी रत्नागिरीत आपल्या घरासमोर एक मंदिर बांधले आणि तेथे वाल्मिकी समाजाचा पुजारी ठेवला ही त्यांची सामाजिक पुरोगामी भूमिका होती. गाय हा उपयुक्त पशु आहे. देवता नव्हे, ही भूमिका सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा परिचय देते, याची आठवण शरद पवारांनी करून दिली.
शरद पवारांनी सावरकर आणि अदानी या दोन मुद्द्यांवर सरळपणे काँग्रेसपेक्षा वेगळी विपरीत भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात उद्यापासून महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा ठिकठिकाणी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सावरकर आणि अदानी या दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेऊन महाराष्ट्रात काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले आहे. त्याचे परिणाम उद्यापासून महाविकास आघाडीच्या होणाऱ्या संयुक्त सभांमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App