विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून वैजापूरच्या गोदावरी धाम सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज ( Ramgiri Maharaj ) यांच्याविरोधात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या संतापाची दखल घेत महाराजांविरोधात येवल्यात एक, वैजापूरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात तीन असे एकूण ५ गुन्हे दाखल झाले आहेत. महंत रामगिरी महाराज यांचा सिन्नर येथे हरिनाम सप्ताह सुरू आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समजताच येवल्यात रात्री पोलिस ठाण्याबाहेर शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन दिले. शुक्रवारी पहाटे तीन वाजेपर्यंत हा गदारोळ सुरू होता. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती हे तातडीने पोलिस ठाण्यात हजर झाले. अखेर शहर काझी सलीमुद्दीन यांची फिर्याद दाखल करुन घेत पोलिसांनी महाराजांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर जमाव निघून गेला.5 cases filed against Ramgiri Maharaj after offensive remarks about Muslim religion; Aggressive crowd in Sambhajinagar-Nagar
नगर जिल्ह्यात तीन गुन्हे
महाराजांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा डीएसपी चौकात येताच जमावाने रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे चौकातून नगरहून छत्रपती संभाजीनगर, मनमाड, पुणे रस्त्याकडे जाणाऱ्या महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, रामगिरी महाराजांवर नगर शहरासह जिल्ह्यातील संगमनेर व राहता येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगरात तणाव, बंद, वैजापूर, गंगापूरमध्ये रास्ता रोको
छत्रपती संभाजीनगरातील सिटी चौक पोलिस ठाण्याबाहेर शेकडो मुस्लिम समाजाचे लोक जमले होते. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. सकाळी अकरापासून पैठण गेट, सिटी चौक, शहागंज या भागातील दुकाने बंद होती. पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केला होता.
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेकांनी शहरातील क्रांती चौक, सिटी चौक, जिन्सी, सातारा, बेगमपुरा ठाण्यांत कारवाईच्या मागणीसाठी निवेदने देण्यात आली. वैजापूर येथे मुस्लिम समाजाने गुरुवारी रात्री रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावर टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. वैजापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अॅड. राफे हसन यांच्या तक्रारीवरून महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले. गंगापूरमध्ये पोलिस स्टेशनमध्येही रात्री मुस्लिम समाज मोठ्या संख्येने जमला होता. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते माघारी गेले. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी यांनी १९ ऑगस्टपर्यंत वैजापूर तालुक्यात जमावबंदीचा आदेश जारी केला.
चित्रफितीशी छेडछाड करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास
प्रवचनात मी चिंतनासंबंधात बोलत होतो. ते धर्मावर नव्हे तर प्रचलित कुप्रथांवर होते. त्या काय आहेत व कशा संपवल्या पाहिजेत हा संदर्भ होता, पण प्रवचनाच्या क्लिपमध्ये छेडछाड करून ती समाज माध्यमांवर हेतुत: पसरवण्यात आली. अाध्यात्मिक क्षेत्राने कुप्रथा दूर करण्याचे कार्य केले पाहिजे. या अर्थाने माझे चिंतन सुरू होते. सराला बेटावर अनेक जातींचे बांधव सुखासमाधानात राहतात. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो. असे माझ्या बोलण्याचे सार असताना विपर्यास केला. – महंत रामगिरी महाराज
छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिस ठाण्याबाहेर जमावामुळे तणाव
या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सिन्नरमध्ये त्यांच्या सप्ताहाला भेट दिली. त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजनही होते. ‘रामगिरी महाराजांचे कार्य खूप मोठे आहे. साधुसंतांची परंपरा पुढे नेण्याचे काम त्यांच्याकडून अविरतपणे सुरू आहे. आमचे सरकार साधुसंतांच्या आशीर्वादावर काम करते. त्यांच्या केसालाही आम्ही धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाविकांना दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App