नाशिक : राहुल गांधी + उद्धव ठाकरे यांचे “हिंदुत्व” वेगवेगळ्या मंदिरांमधून बाळासाहेबांच्या स्मारकापर्यंत आले; पण शिवाजी पार्क वरून सावरकरांवर बोलायची हिंमत नाही दाखवू शकले!!, याच शब्दांमध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या भाषणांचे वर्णन करावे लागेल. Rahul Gandhi and uddhav thackeray did not dare to utter a single word about Savarkar!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंगीकारलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राजकीय हिंदुत्वाला विरोध करताना राहुल गांधींनी मंदिरा – मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा सपाटा लावून “सॉफ्ट” हिंदुत्वाची कास धरलीच होती, ती अधून मधून सोडली. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करताना पुन्हा ते “सॉफ्ट” हिंदुत्वाच्या दिशेनेच गेले. शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आणि बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करताना राहुल गांधींबरोबर उद्धव ठाकरे पण होते. सभा राहुल गांधींची आणि गर्दी शिवसेनेची अशी आजची अवस्था होती!!
पण त्यापूर्वी आज दिवसभर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या निशाण्यावर हे दोनच नेते राहिले होते. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्र बसणार, पण ते सावरकरांवर बोलणार का?? आणि सावरकरांच्या अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे शेजारी बसवून घेणार का??, असे खोचक सवाल भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिवसभर केले. एकनाथ शिंदे यांच्यापासून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत सगळ्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना त्याच मुद्द्यावर ठोकून काढले.
शेवटी सावरकरांचे नातू आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी देखील राहुल गांधींचे आता सावरकरांवर बोलण्याची हिंमत होणारच नाही, असे त्यांना डिवचून घेतले. पण भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप समारंभात नेमके हेच चित्र दिसले!!
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर तडाखेबंद भाषणे जरूर केली. त्या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, जीएसटी, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, इलेक्ट्रोरल बॉण्ड्स वगैरे मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले, पण दोन्ही नेत्यांच्या भाषणात “सावरकर” हा शब्द देखील आला नाही!!
*जणूकाही शिवाजी पार्क वरून हाकेच्या अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक असल्याचे उद्धव ठाकरे “विसरूनच” गेले होते, राहुल गांधींचे तर त्याकडे लक्ष जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण ते काहीही असले तरी राहुल गांधींचे “सॉफ्ट हिंदुत्व” आज उद्धव ठाकरे यांच्यामुळे का होई ना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापर्यंत आले, पण ते दोन्हीही नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायची हिंमत नाही दाखवू शकले!!, हेच आजच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेचे खरे वैशिष्ट्य ठरले!!*
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App