नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकाच कॅटेगरीत आले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी आरोपांचे हिट अँड रन केले, पण निवडणूक आयोगाने त्यांना बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!! Rahul Gandhi
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून राहुल गांधी बिथरले. त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या बरोबरीने केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील सतत घेरले. राहुल गांधींनी मोदी सरकारला जेवढ्या शिव्या दिल्या, त्यापेक्षा जास्त शिव्या त्यांनी निवडणूक आयोगाला मोजल्या. महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी निवडणुकीत घोटाळा, मतदानात मतदार यादीत नावे वाढवून मतदानात गैरव्यवहार वगैरे आरोपांची सभ्य भाषा वापरली पण कर्नाटक निवडणुकीबाबत मात्र त्यांनी ही सभ्यता ओलांडली. त्यांनी थेट निवडणूक आयोगावर मतदान चोरीचा आरोप केला. त्याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगावर वाटेल तसे बेछूट आरोप केले. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे याचे भानही त्यांनी आरोप करताना ठेवले नाही.
लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याचा आदर्श पुढे ठेवून बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते पुढे आले. तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट निवडणूक आयोगाने आपले आणि आपल्या पत्नीचे नावच मतदार यादीतून वगळण्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी बिहार SIR प्रक्रियेवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले. निवडणूक आयोगावर आरोप करण्यात त्यांनी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.
निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना पत्र
पण हे सगळे घडत असताना निवडणूक आयोगात मात्र राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याची तयारी सुरू होती. निवडणूक आयोगाने सुरुवातीला राहुल गांधींच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले, पण त्या आरोपांची भाषा खालच्या स्तरावर गेल्याबरोबर आयोगाने राहुल गांधींना घेरले त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना प्रत्यक्ष समोर येऊन चर्चा करायचे आवाहन करणारे पत्र जाहीरपणे सोशल मीडियावर शेअर केले. निवडणूक आयोगाने हे पत्र 12 जून 2025 रोजी लिहिले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक मधल्या निवडणुकांविषयी राहुल गांधींना ज्या कुठल्या शंका आहेत, त्या त्यांनी निवडणूक आयोगासमोर येऊन स्पष्टपणे मांडाव्यात. समोरासमोर बसून चर्चा करावी. त्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी तयार आहेत, असे निवडणूक आयोगाने राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. मात्र, राहुल गांधी त्यावेळी चर्चेला पुढे आले नव्हते. ते त्यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही गेले नव्हते, हे या निमित्ताने निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळले.
तेजस्वी यादवांना पण आवाहन
त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांना देखील आज म्हणजे 3 ऑगस्ट 2025 रोजी पत्र पाठविले. तेजस्वी यादव यांनी त्यांच्याकडचा एपिक नंबर निवडणूक आयोगाला सादर करावा त्या नंबर नुसार चौकशी आणि तपास करून आरोपांमधले तथ्य समोर आणता येईल, असे निवडणूक आयोगाने लिहिलेल्या पत्रात नमूद केले. पण त्या आधीच तेजस्वी यादव आणि त्यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीत असल्याचेही निवडणूक आयोगाने दाखवून दिले. निवडणूक आयोगाने आवाहन केल्यानंतर राहुल गांधी तर आयोगाच्या कार्यालयात गेले नव्हते मग आता तेजस्वी यादव निवडणूक आयोगाच्या पत्राला उत्तर देऊन एपिक नंबर सादर करणार की नाही??, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App