विशेष प्रतिनिधी
बरेली : तीन तलाक विरोधी लढ्यामुळे चर्चेत आलेल्या बरेली येथील निदा खान हिला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याने धमक्या दिल्या जात आहेत. अलीकडेच मला एका विवाह समारंभात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. पोलीस वेळीच पोहचले नसते तर मी झुंडबळी ठरले असते. माझ्या पतीने तर माझ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली आहे. मी भाजपमध्ये प्रवेश केला या एकाच कारणासाठी मला त्रास दिला जात आहे’, असे निदा खान हिने सांगितले.Punishment for joining BJP, threat to throw acid on Nida Khan, victim of Triple Talaq
स्वत: तीन तलाक पीडित असलेल्या निदाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यावरूनच तिला सासरच्या मंडळींकडून आणि समाजातील प्रतिष्ठीतांकडून धमक्या दिल्या जात असून याबाबत माध्यमांकडे तिने आपली व्यथा मांडली आहे. निदा खान तीन तलाकची शिकार ठरली आहे. तिने याविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. तीन तलाक आणि हुंडा उकळल्याप्रकरणी तिने कोर्टात दावा दाखल केला आहे.
बरेली येथील रहिवासी असलेल्या निदा हिने विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर निवडणुकीत ती भाजपचा प्रचार करत होती. मुस्लिम समाजाने भाजपला मतदान करावे, असे आवाहन ती प्रचारादरम्यान करत होती. त्यावरच तिच्या सासरच्या मंडळींनी आणि समाजातील प्रमुख व्यक्तींनी आक्षेप घेतल्याचा तिचा आरोप आहे. एका नात्यातील विवाहसोहळ्यात घडलेल्या घटनेचा संदर्भ देत तिने आपल्या जीवाला धोका असल्याचेही नमूद केले आहे.
निदा खान म्हणाली, नुकतीच मी माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. तिथे मला प्रवेश देण्यात आला नाही. भाजपशी फारकत घेण्याची हमी दिलीस तरच तुला लग्नात सहभागी होण्याची परवानगी मिळेल, असे मला धमकावण्यात आले. तिथे मोठा जमाव होता. त्या सर्वांकडूनच माझ्यावर दबाव टाकला जात होता.
याबाबत मी पोलिसांना माहिती देताच पोलीस तिथे दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर तिथे जमावाने माझ्यावर हल्ला केला असता. मी झुंडबळी ठरले असते’, असे निदा म्हणाली. तीन तलाक विरोधात मी कोर्टात लढत असल्याचा राग सासरच्या मंडळींच्या मनात आहे. माझ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी पतीकडून देण्यात आली आहे.
त्यात मी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याचा अधिकच राग सासरकडच्यांना आहे. तिथून मला सतत धमकावण्यात येत आहे. मात्र मी मागे हटणार नाही. भाजपात यापुढेही सक्रिय राहणार, असे निदाने स्पष्ट केले.
निदा खान हिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तिला लग्नसोहळ्यात सहभागी होण्यापासून रोखल्याप्रकरणी व धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. याबाबत बरेलीचे विशेष पोलीस अधीक्षक रोहित सिंह यांनी माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App