यासोबतच पक्ष 40 जागांवर महिला उमेदवार उभे करणार असल्याचेही सांगण्यात आले
विशेष प्रतिनिधी
पटणा : जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी बिहारमधील सर्व 243 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच पक्ष 40 जागांवर महिला उमेदवार उभे करणार असल्याचेही सांगण्यात आले.
2030 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष 70 ते 80 जागांवर महिला उमेदवार उभे करणार आहे. रविवारी पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित जन सूरज महिला संवाद कार्यक्रमानंतर प्रशांत किशोर पत्रकारांशी बोलत होते.
प्रशांत किशोर म्हणाले की, जोपर्यंत महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा समाजातील सहभाग समानतेच्या आधारावर होऊ शकत नाही. त्यामुळे यावेळी 40 महिलांना निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे. महिलांना नोकरी आणि व्यवसायासाठी 4 टक्के व्याजाने कर्ज मिळावे, यासाठी सरकारी हमी आवश्यक आहे, अशी मागणीही प्रशांत किशोर यांनी केली. यावेळी बिहारमध्ये जनतेचे सरकार येणार असून, जनसूराज पक्षाच्या स्थापनेची घोषणा 2 ऑक्टोबरला केली जाईल, असा दावा त्यांनी केला.
जात जनगणनेच्या मागणीवर प्रशांत किशोर म्हणाले की, राहुल गांधींनी सर्वांना सांगावे की जर जात जनगणनेने गरिबी हटली असती, तर बिहारमधील गरिबी का हटली नाही. ते म्हणाले की, देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App