विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा सभा होणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात दोन अशा एकूण दहा प्रचारसभा पंतप्रधान मोदी घेणार आहेत. एकावेळी किमान १५ ते २० उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. ८ नोव्हेंबर रोजी धुळे व नंदुरबार, ९ नोव्हेंबर : अकोला व नांदेड येथे सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर : चंद्रपूर व चिमूर, सोलापूर आणि पुणे, १४ नोव्हेंबर : संभाजी नगर व मुंंबई अशा सभा आहे.
पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट या अन्य दोन घटक पक्षांनीही केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा १४ नोव्हेंबरनंतर परदेश दौरा असल्याने त्यापूर्वी त्यांच्या प्रचारसभा राज्यात करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रत्येकी १५-२० सभा होणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५० हून अधिक प्रचारसभा राज्यात घेणार आहे.
२०१९ मध्ये ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात केवळ ९ प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना महाराष्ट्रात तब्बल १९ सभा घ्याव्या लागल्या. कारण २०२४ मध्ये भाजपासाठी महाराष्ट्रात मोठे आव्हान होते. त्यामुळे स्वत: पंतप्रधान मोदींनी तब्बल १९ सभा आणि एक रोड शो महाराष्ट्रात केला होता. पण मोदींनी एवढ्या सभा घेऊन देखील महाराष्ट्रात त्यांना केवळ ९ जागांवरच विजय मिळवता आला तर एनडीएला फक्त १७ जागाच मिळाल्या. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी वर्धा, गोंदिया, नांदेड, लातूर, अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, नंदूरबार व मुंबई अशा सभा घेतल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App