प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मागील एक वर्षापासून जगभरातील ३७ लाखांहून अधिक आणि भारतात साडेतीन लाखांहून अधिक जणांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले. नागरिकांना कोरोना संकटापासून वाचविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधे पेटंटमुक्त होण्याबाबत जनमानसांत जागृती निर्मांण करण्याकरिता स्वदेशी जागरण मंचाच्या वतीने रविवार, २० जून रोजी ‘विश्व जागृती दिन’ साजरा करण्यात आला. Patent free corona vaccine drive by swadeshi jagran manch marks good response
संपूर्ण देशभरात आणि जगभरातील काही भागांत दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर मुंबईत एकूण ३० ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यापैकी २२ ठिकाणी प्रत्यक्ष रुपात तर आठ ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम संपन्न झाला. या दिनानिमित्त राष्ट्रीय परिषदेचे सदस्य अनिल गचके व प्रांत संयोजक प्रशांत देशपांडे यांनी कोकण प्रांतातील जनतेचे या अभियानाला सक्रिय सहभागाने यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.
कोविड लसींच्या उत्पादनामध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिप्स नियमावलीअंतर्गत येणारे पेटंट हे कायदा आणि बौद्धिक संपदा अधिकार अन्य औषधी कंपन्यांना लस तयार करण्याकरिता परवानगी देत नाही. जगभरातील ७.८७ अब्ज लोकसंख्येला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पेटंटमुक्त कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी पेटंट कायद्यात सुलभता आणणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांचे समर्थन मिळावे, जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिप्स नियमावलीअंतर्गत सूट मिळावी तसेच सार्वजनिक दबाव निर्माण व्हावा म्हणून मंचाच्या ‘युनिव्हर्सल ऍक्सेस टू व्हॅक्सिन अँड मेडिसिन’ (यूएवीएम) या अभियानाअंतर्गत हा दिवस साजरा करण्यात आला.
या मागणीसाठी स्वदेशी जागरण मंचाच्यावतीने डिजिटल स्वाक्षरीच्या अभियानही राबविण्यात आले. जगभरातील १६ लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी करून आपले समर्थन दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App