वृत्तसंस्था
गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची ( Palestinian ) संख्या 40 हजारांच्या पुढे गेली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी, 15 ऑगस्ट रोजी ही माहिती दिली. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 90 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत हमासच्या दहशतवाद्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो. अनेक मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत.
गाझामध्ये 11 महिन्यांपासून युद्ध सुरू
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला जवळपास 11 महिने उलटले आहेत. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवले होते.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार 111 लोक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. यामध्ये 39 मृतदेहांचाही समावेश आहे. ओलिसांमध्ये 15 महिला आणि 5 वर्षांखालील 2 मुलांचा समावेश आहे. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. या युद्धात आतापर्यंत 329 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार त्यांनी आतापर्यंत 15 हजारांहून अधिक हमास दहशतवाद्यांना ठार केले आहे. युद्धामुळे इस्रायल आणि दक्षिण लेबनॉनमधील हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. त्याचवेळी गाझामधील सुमारे 18 लाख लोकांनी आपली घरे सोडली आहेत.
5 लाख लोकांवर उपासमारीचे संकट
युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. इस्रायलच्या हल्ल्याचा फटका बसणाऱ्या गाझातील नागरिकांसमोर उपासमारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एका अहवालानुसार गाझामधील सुमारे 5 लाख लोकांना येत्या काही महिन्यांत अन्न संकटाचा सामना करावा लागणार आहे. हा आकडा गाझाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास एक चतुर्थांश आहे.
अहवालानुसार, इस्रायली हल्ल्यांमुळे गाझामधील 59% इमारती नष्ट झाल्या आहेत. उत्तर गाझा मध्ये ही संख्या 70% पेक्षा जास्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App