नाशिक : मध्य प्रदेश, राजस्थान सह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 2014 लोकसभा निवडणूक जवळ येत असताना विरोधकांकडे नव्या आयडियांची वानवा दिसते आहे, त्यामुळेच ते जुने मुद्दे आणि आयकॉन्स यांच्यावर आपापसांमध्ये डल्ला मारत आहेत!! Opposition parties have no new political ideas against BJP, therefore they harp on old ideas and steals each other’s icons
आता हेच पहा ना :
नव्या संसदेत मोदी सरकारने 33% महिला आरक्षणाचे विधेयक संमत करून घेतले. वास्तविक हे विधेयक मूळचे काँग्रेसचे. पण काँग्रेसला गेल्या 27 वर्षांमध्ये आपल्या सत्ताकाळात ते संमत करून घेता आले नव्हते. पण हे विधेयक भाजपने मंजूर करून घेताच, त्याचे श्रेय मोदी सरकारला मिळेल हे पाहून राहुल गांधींनी ताबडतोब जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलला आणि त्यातही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रेटून धरला. वास्तविक जातनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षण हे समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांचे मुद्दे. काँग्रेस सत्ताधारी असताना हे मुद्दे त्या पक्षाने कधीच स्वीकारले नाहीत. उलट आपले राजकारण केवळ एकजातीय न ठेवता, ते बहुजातीय किंबहुना बहुधर्मीय ठेवले. त्यातून काँग्रेसला अनेक दशके यश मिळाले.
पण भाजपने आपल्या राजकारणाचा बाज बदलून राजकीय हिंदुत्वाच्या कक्षेत “सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास” आणले आणि काँग्रेसचे राजकारण घसरले. म्हणूनच महिला विधेयक आरक्षण मंजूर झाल्यानंतर राहुल गांधींनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलासारख्या प्रादेशिक पक्षांचा जातनिहाय जनगणनेचा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा बेमालूमपणे चोरला आणि काँग्रेसच्या अजेंड्यात मिसळून टाकला!!
आता समाजवादी पार्टीचे किंवा राष्ट्रीय जनता दलाचे नेते जेवढ्या मोठ्या आवाजात जातनिहाय जनगणना किंवा ओबीसी आरक्षणावर बोलत नाहीत, त्यापेक्षा मोठ्या आवाजात राहुल गांधी या मुद्द्यांवर बोलायला लागले आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की काँग्रेसला भाजप विरोधात नवा मुद्दाच सापडेनासा झाला आहे, त्यामुळे त्यांनी प्रादेशिक पक्षांचा जातनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे.
राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींचे जे घडले आहे, तसेच सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्र पातळीवर घडले आहे.
सुप्रिया सुळे महाराष्ट्रात आता मराठी माणूस, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार वगैरेंचा वारसा बोलू लागल्या आहेत. लोकसभेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या भेटीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा वारसा यांचे महत्त्व सांगितले. भाजप, विशेषत: देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची घरे फोडण्यात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे शरसंधान त्यांनी साधले. पण ते साधताना सुप्रिया सुळे यांनी बेमालूमपणे शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा जणू काही राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचाच वारसा आहे, असे “पॉलिटिकल मिक्सश्चर” जनतेपुढे पेश केले!!
वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि मराठी माणूस हा मुद्दा ही शिवसेनेची देन आहे. भले आज शिवसेनेत दोन गट झाले असतील, पण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा महाराष्ट्रासाठीच काय, पण देशासाठी सामायिक आहे. उद्धव ठाकरे यांनी तो वारसा फक्त कुटुंबापुरता संकुचित करवून घेतला आहे. पण ते काहीही असले तरी सुप्रिया सुळे यांचा बाळासाहेबांच्या कोणत्याच वारसाशी काहीही संबंध नाही.
उलट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे राजकीय वैर तीन दशके महाराष्ट्राने पाहिले आहे. पवार आणि ठाकरे हे सातत्याने एकमेकांविरोधातच राजकीय भूमिका घेत राहिले. पण बाळासाहेबांनी आयकॉन स्वरूपात शरद पवारांवर केव्हाच मात केली. बाळासाहेबांच्या निधनानंतर तब्बल 12 वर्षांनी त्यांचे नाणे जेवढे खणखणीत वाजते, तेवढे पवारांच्या हयातीत त्यांचे स्वतःचे नाणे खणखणीत वाजत नाही ही वस्तुस्थिती आहे.
कारण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा दोन्ही शिवसेना, मनसे आणि भाजप हे एकत्रितरित्या सांगू शकतात. तसा शरद पवारांचा वारसा आता फक्त शरदनिष्ठ राष्ट्रवादी पुरता उरला आहे. काँग्रेस देखील शरद पवारांचा वारसा सांगायला राजी नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शरद पवारांच्या राजकीय वारशाची गरजही नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी उचलला, तो बाळासाहेबांचा वारसा फक्त उद्धव ठाकरेंचा कौटुंबिक वारसा आहे. एक प्रकारे सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या कौटुंबिक वारशावरच डल्ला मारला आहे.
या पलीकडे सुप्रिया सुळेंच्या या राजकीय डल्ल्याचा असाही अर्थ आहे, की शरदनिष्ठ राष्ट्रवादीला आता खुद्द शरद पवारांचा वारसाही पुरेनासा झाला आहे. त्यामुळेच बाळासाहेबांच्या वारशाची त्यांना गरज भासू लागली आहे. पण या सगळ्याची गोळाबेरीज हीच, की विरोधकांकडे नव्या आयडियांची वानवा झाली आहे आणि त्यामुळे ते एकमेकांच्या मुद्द्यांवर आणि आयकॉन्स वर परस्पर डल्ला मारत आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App