विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील जी 23 गटाचे प्रमुख नेते आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस वेगळा डाव करण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसपासून वेगळे होऊन ते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखाच नवा पक्ष स्थापन करतील, अशी राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. No new party; but can’t predict the future, says gulam nabi azad
या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्वाचा खुलासा केला आहे. नवा पक्ष काढणार नाही, पण राजकारणात पुढे काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही, असे सूचक उद्गार गुलाम नबी आझाद यांनी काढले आहेत. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात मतभेद उघडपणे सांगायला वाव होता. आताच्या काँग्रेसमध्ये तो वाव उरलेला नाही, अशा परखड शब्दात त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडले आहे. अर्थात त्याच वेळी हे काँग्रेस नेतृत्वाला आव्हान नाही, असा खुलासाही केला आहे.
काँग्रेस पक्षात लोकशाही असावी, अशी आमची नेहमीच मागणी राहिली आहे. काँग्रेस नेतृत्वाने या मागणीला जरूर प्रतिसाद दिला पाहिजे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी दोन्ही नेते आमचे ऐकून घेत असत. मतभेद असले तरी मतभेद व्यक्त करणारे नेते आपल्या नेतृत्वाला आव्हान देत आहेत, असे त्यांनी कधी मानले नाही याची आठवण गुलाम नबी आझाद यांनी करून दिली.
गुलाम नबी आझाद हे जम्मू – काश्मीरच्या दौऱ्यावर होते. पूंच, राजौरी आदी शहरांमध्ये त्यांनी जाहीर सभांना संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी केलेली भाषणे राजकीय दृष्ट्या सूचक असल्याचे बोलले जाते. त्यांनी सुरक्षा दलांची स्तुती केली. जम्मू-काश्मीर मधून दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी सुरक्षा दले उत्तम काम करत आहेत. त्यांना काश्मिरी जनतेने सहकार्य केले पाहिजे. सुरक्षा दलांनी देखील काश्मिरी जनतेच्या सहकार्याने दहशतवाद्यांशी मुकाबला केला पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याच बरोबर काँग्रेसला 2024 च्या निवडणुकीत 300 जागा मिळणे शक्य नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा 370 कलम आणि 35 हे उपकलम लागू होण्याची आशा उरलेली नाही. त्याऐवजी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लवकरात लवकर राज्याचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यांची ही वक्तव्ये केंद्रातल्या भाजप सरकारला अनुकूल असल्याचे मानले जात आहे.
त्याचबरोबर गुलाम अहमद मीर या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष यांच्याविरोधात आझाद गटाच्या २० नेत्यांनी काँग्रेसचे नुकतेच राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याकडे पाहिले गेले.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखाच गुलाम नबी आझाद यांनी देखील जर वेगळा मार्ग चोखाळला तर ती फक्त काँग्रेसमध्ये फूट नसेल तर काँग्रेसमध्ये राहून पक्षनेतृत्वाशी संघर्ष करणाऱ्या जी 23 गटामध्ये देखील ती फूट असेल. कारण आत्तापर्यंत जी 23 गटाच्या सर्व नेत्यांनी काँग्रेसमध्ये राहूनच नेतृत्वाशी मर्यादित अर्थाने संघर्ष करण्याची भूमिका ठेवली होती. परंतु त्या गटाचे प्रमुख नेते गुलामनबी आझाद हेच जर बाहेर पडणार असतील तर जी 23 गटही फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत भविष्यकाळात काँग्रेसला आणखी किती फुटींना सामोरे जावे लागेल?, याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App