
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बालक बुद्धी या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भाषणाचे लोकसभेत वाभाडे काढले. राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्यावर मोदींनी खणखणीत प्रत्युत्तर दिले. Narendra Modi criticized Leader of Opposition Rahul Gandhi’s speech in Lok Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इशारा दिल्यानंतरही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गोंधळ थांबवला नाही. त्यानंतर पंतप्रधान हेडफोन लावून आपलं भाषण सुरु ठेवले. राहुल गांधींनी काल 90 मिनिटे भाषण करून जे मुद्दे उपस्थित केले होते त्या प्रत्येक मुद्द्याला मोदींनी चपखल प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले पंतप्रधान?
आपल्या भाषणात पीएम मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आदरणीय राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात विकसित भारताच्या संकल्पाचा उल्लेख केला. राष्ट्रपतींनी आपल्या सर्वांना आणि देशाला मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल मी राष्ट्रपतींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
निवडणूक मोहिम यशस्वी करुन देशाने जगाला दाखवून दिलं आहे की ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. देशातील जनतेने जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रचारात आम्हाला निवडून दिलं आहे. मी काही लोकांच्या वेदना समजू शकतो की सतत खोटं बोलूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. जगातील सर्वात मोठ्या निवडणूकीत देशातील जनतेने तिसऱ्यांदा देशसेवा करण्याची संधी आपल्याला दिली आहे.
लोकशाही जगतासाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची घटना आहे. देशातील जनतेने प्रत्येक मार्गावर आमची कठिण परीक्षा घेतल्यानंतर आम्हाला हा जनादेश दिला आहे. जनतेने आमचा 10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या मंत्राला अनुसरून आपण गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित भावनेने काम केल्याचे जनतेने पाहिले आहे. 2014 मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा जिंकलो, त्यावेळी देखील निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता ठेवणार असल्याचे सांगितलं होतं. भ्रष्टाचाराबाबतच्या आपल्या धोरणामुळेच देशाने आपल्याला वरदान दिलं आहे.
या देशाने तुष्टीकरणाचं राजकारणही दीर्घकाळ पाहिले पण आम्ही तुष्टीकरणाचा नाही, तर समाधानाचा विचार करत आहोत. सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता हा आमचा सिद्धान्त आहे.
देशातील जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन मान्यता दिली आहे. भारतातील जनता किती प्रगल्भ आहे, भारतातील जनता किती विवेकी आहे, हे या निवडणुकीने सिद्ध केलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज तिसऱ्यांदा आपण देशवासीयांसमोर आलो आहोत. या निवडणुकीत विकसित भारताच्या आमच्या संकल्पासाठी आम्ही आशीर्वाद मागितले होते. विकसित भारत घडवण्याची कटिबद्धता आणि सद्भावनेने आम्ही सर्वसामान्यांचे कल्याण करण्याच्या उद्देशाने लोकांसमोर गेलो होतो.
मी देशवासियांना आश्वासन देतो की, विकसित भारताचा जो संकल्प प्रामाणिकपणाने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचा प्रत्येक क्षण आणि आमच्या शरीराचा प्रत्येक कण समर्पित करू.
2014 मध्ये देशातील जनतेने आम्हाला सेवेसाठी निवडले आणि तो क्षण देशासाठी बदललेल्या युगाची सुरुवात होता. आज माझ्या सरकारला गेल्या 10 वर्षात अनेक यश मिळालं आहे. पण या सर्व कामगिरीला बळ देणारी एक कामगिरी म्हणजे देश निराशेच्या गर्तेतून बाहेर पडला आणि आशा आणि विश्वासाने उभा राहिला.
2014 पूर्वी दहशतवादी कोठेही हल्ले करण्यास मोकळे होते, जेव्हा निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले होते, जेव्हा भारताच्या प्रत्येक कोपऱ्याला लक्ष्य केलं जात होतं आणि सरकार शांत राहण्याशिवाय काहीही करत नव्हतं. पण 2014 नंतर हा नवा भारत घराघरात पोहोचला आहे. आज कलम 370 ची भिंत पडली आहे, दगडफेक थांबली आहे, लोकशाही मजबूत आहे आणि लोक भारताच्या संविधानावर मोठ्या विश्वासाने मतदान करण्यासाठी पुढे येत आहेत.
पण या देशात काही बालक बुद्धी लोक स्वतःच्या पराभवाचे पेढे वाटत सुटले आहेत. त्यांना शंभर पैकी 99 मार्क मिळालेले नाहीत त्यांना 543 पैकी 99 मार्क मिळाले आहेत, पण त्या बालक बुद्धींना सांगणार कोण की हा विजय नसून हा पराभव आहे!!
या बालक बुद्धीवरच वीर सावरकरांचा अपमान केल्याचा खटला दाखल आहे आणि ही बालक बुद्धी एखाद्या मुलाने आपल्याला शाळेत मारले जी तक्रार करावी, तशी सहानुभूती मिळवण्यासाठी तक्रार करत आहे. पण ही बालक बुद्धी खोटं बोललेलं किंवा खोड्या काढलेलं सांगत नाही. या बालक बुद्धीने अग्निवीर योजनेबद्दल काल खोटं व्यक्तव्य केलं. राफेल पासून सगळ्या व्यवहारांमध्ये ती बालक बुद्धी खोटं बोलली.
या बालक बुद्धीने काँग्रेस पार्टी बुडवली आहे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रादेशिक मित्र पक्षांची मते खाल्ली नसती, तर त्यांच्या 99 जागा देखील निवडून आल्या नसत्या, पण काँग्रेस पक्षाने आपल्याच प्रादेशिक मित्र पक्षांची मते खाल्ली आणि त्यांच्या बळावर आज काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता बसला आहे. काँग्रेस हा आता परजीवी पक्ष बनला आहे.
Narendra Modi criticized Leader of Opposition Rahul Gandhi’s speech in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया, म्हणाले- हायकमांडचा निर्णय…
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; गट ‘क’च्या रिक्त पदांची भरती MPSC मार्फत; पेपरफुटीचा कायदाही येणार
- अग्निवीराबाबत राहुल गांधींनी लोकसभेत चालविला नॅरेटिव्ह खोटा; पण शहीद अग्निवीराच्या वडिलांनी सांगितला मदतीचा आकडा!!
- ‘राहुल गांधींनी माफी मागावी… संपूर्ण संत समाज..’ ; स्वामी अवधेशानंद संतापले!