मध्य प्रदेश आणि राजस्थान मधल्या निवडणुकांचे INDI आघाडीवर काय परिणाम व्हायचे ते होवोत, पण सोनिया – राहुल आणि प्रियंका गांधी या काँग्रेस हायकमांड वर त्याचे बिलकुल काही परिणाम होणार नाहीत. पण या दोन निवडणुकांचे सर्वात गंभीर परिणाम कमलनाथ आणि अशोक गहलोत यांच्यावर मात्र नक्की झाले आहेत. हे तेच कमलनाथ आणि अशोक गेहलोत आहेत, जे अहमद पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये त्यांची जागा घ्यायला निघाले होते, पण ते “अहमद पटेल” बनणे तर सोडाच, त्यांचे पुरते “शरद पवार” झाले आहेत. हे दोन्ही नेते प्रणव मुखर्जींकडूनही काही शिकू शकले नाहीत!! Kamalnath and ashok gehlot’s political career ends with defeat like sharad pawar
वर उल्लेख केलेले विधान कोणतीही उथळ राजकीय टीका टिप्पणी अथवा टिंगल टवाळी करण्यासाठी केलेले नाही. त्या आर्ग्युमेंट मध्ये पुरेसे गांभीर्य आहे. किंबहुना वर उल्लेख केलेल्या प्रत्येक नेत्याचे महत्त्व ओळखून हे आर्ग्युमेंट केले आहे.
आता कमलनाथ आणि अशोक गहलोत हे “अहमद पटेल” बनायला निघाले होते म्हणजे नेमके काय??, याचा नीट अर्थ समजून घेतला पाहिजे.
अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव होते. काँग्रेसमध्ये अध्यक्षांच्या राजकीय सचिवाला किती अनन्यसाधारण महत्व असते हे समजून घ्यायला फार मोठ्या रॉकेट सायन्स अभ्यास करण्याची गरज नाही. सत्ताधारी काँग्रेस पक्षाची संपूर्ण सूत्रे काँग्रेस अध्यक्षांच्या राजकीय सचिवाच्या हातात असतात. राजकीय सचिव हे इतके कळीचे पद आहे की, त्याच्या एका कटाक्षाने केंद्रीय मंत्री अथवा राज्यांचे मुख्यमंत्री बसतात किंवा उठतात, ही काँग्रेस अध्यक्षांच्या राजकीय सचिवांची क्षमता होती. काँग्रेस मधले सर्व राजनैतिक आणि रणनीतीचे निर्णय कौशल्य पूर्वक घेणे हे राजकीय सचिवाचे काम असते, ते काम अहमद पटेल आपल्या विशेष कौशल्याने तब्बल 20 वर्षे पार पाडत होते. या 20 वर्षांपैकी 10 वर्षे काँग्रेस प्रणित यूपीए आघाडी केंद्रात सत्तेवर होती आणि 14 राज्यांमध्ये त्यांचे मुख्यमंत्री होते. या सर्वांवर सोनिया गांधीचा तर वचक होताच, पण तो वचक अहमद पटेल या राजकीय सचिवाच्या जरबेचा होता.
सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या संपूर्ण हातात ठेवण्याची अहमद पटेल नावाच्या राजकीय सचिवाची क्षमता होती. ती क्षमता त्यांनी पूर्ण वापरली होती. आता इथे लक्षात येईल, काँग्रेसमध्ये “अहमद पटेल” बनणे म्हणजे काय?, ते!!
अहमद पटेल यांचे 25 नोव्हेंबर 2020 ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ही राजकीय पोकळी काँग्रेसमध्ये अद्याप कोणालाही भरता आलेली नाही. मात्र अहमद पटेल यांची जागा घेण्याची संधी कमलनाथ आणि अशोक गेहलोत या दोन्ही नेत्यांना आली होती. अशोक गेहलोत यांना तर काँग्रेस अध्यक्षपदाची देखील संधी आली होती. अहमद पटेल यांच्या निधनानंतर कमलनाथ यांना सोनिया गांधींचे राजकीय सचिव नेमण्याचे घाटत होते. परंतु, काँग्रेस केंद्रात सत्तेवर नाही या कारणास्तव कमलनाथ यांनी ते राजकीय सचिव पद नाकारले आणि मध्य प्रदेशात राजकारण करून मध्य प्रदेशचेच मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा बाळगली. कमलनाथ यांची ही महत्त्वाकांक्षा कालच्या निवडणूक निकालाने पूर्णपणे धुळीस मिळाली आहे.
कमलनाथ आता 77 वर्षांचे आहेत. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते, अशी शक्यता कितीही गृहीत धरली तरी कमलनाथांचे राजकीय करिअर आता पुन्हा त्यांना हवे तसे उभे राहणे अत्यंत कठीण आहे आणि आपला मुलगा नकुल नाथ याचेही राजकीय करिअर उभे करता येणे आता अवघड आहे.
जे कमलनाथांचे झाले, तेच अशोक गेहलोत यांचे झाले आहे. फक्त अशोक गेहलोत यांना 5 वर्षे वयाचा एडवांटेज आहे. कारण अशोक गेहलोत आता 72 वर्षांचे आहेत. पण राजस्थानातील पुढची निवडणुकी येईपर्यंत ते देखील 77 वर्षांचे झाले असतील आणि तोपर्यंत देशातल्या सर्व नद्यांमधून भरपूर राजकीय पाणी वाहून गेलेले असेल!!
पण याच अशोक गेहलोत यांना दोनच वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष होण्याची संधी आली होती. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ऐवजी अशोक गेहलोत यांचेच नाव त्यावेळी आघाडीवर होते. त्यावर गांधी परिवाराने शिक्कामोर्तब देखील केले होते, पण अशोक गेलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा मोह सोडवत नव्हता. सत्ताधारी नसलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष पद घेऊन करायचे काय?? त्यापेक्षा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद बरे!!, असे अशोक गेहलोत त्यांना त्यावेळी वाटले. त्यांनी त्यानंतर फकात दोन वर्षे सत्ता देखील भोगली पण त्या मुख्यमंत्री पदाची अखेर तरी काय झाली??, तर अशोक गेहलोत यांना राजस्थानातील सत्ता गमवावी लागली आणि ते आज काँग्रेसचे अध्यक्षही नाहीत. राजस्थानातली सत्ता गमावल्यानंतर गांधी परिवार त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसेल बसवेल ही शक्यता फारच दुरापास्त आहे.
प्रणवदांची शिकवणूक
एखादे पद मिळाले, तर त्याला न्याय द्यायचा आणि करियर पुढे सरकवताना योग्यवेळी ते पद सोडायचे, एखादे पद मिळाले नाही, तर त्या पदाला बायपास करून दुसरे पद मिळवायचे, हे राजकीय तत्त्व प्रणव मुखर्जींनी आपल्या राजकीय आयुष्यात पाळले. प्रणव मुखर्जींना पंतप्रधान व्हायचे होते, पण त्यांच्या आयुष्यात ते घडू शकले नाही. पण योग्य वेळी केंद्रीय अर्थमंत्री पदावरून बाजूला होत. त्यांनी सोनिया गांधींनी दिलेली राष्ट्रपतीपदाची ऑफर स्वीकारली आणि आपली राजकीय कारकीर्द दिमाखदारपणे राष्ट्रपती पदावरून संपुष्टात आली. ही राजकीय शिकवण अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांना शिकता आली नाही. त्यामुळे आपली राजकीय कारकीर्द या दोन्ही नेत्यांना ग्रेसफुली संपवता आली नाही.
या बाबतीत त्यांचा पुरता “शरद पवार” झाला. शरद पवारांना देखील सतत ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये राहण्याची एवढी हौस आहे की, आपला राजकीय पठडीचा काळ आता संपला. आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्या मुलीचे करियर सेट करण्याच्या नादात ते आजही ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये तसेच उभे आहेत आणि आता फक्त आपल्याच गटाचे ते अध्यक्ष उरले आहेत, ज्या गटाला निवडणूक आयोग अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस अशी मान्यता देणार की नाही??, याची भ्रांत आहे. तशी मान्यता दिली तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तहहयात अध्यक्ष म्हणून राहतील आणि मान्यता दिली नाही, तर नव्या कुठल्यातरी आपल्या गटापुरत्या उरलेल्या पक्षाचे अध्यक्ष होतील.
पवार “अर्श से फर्श पर!!”
एकेकाळी शरद पवार देखील पंतप्रधान पदाला गवसणी घालण्यासाठी दिल्लीत गेले होते. पंतप्रधान पदाची संधी त्यांना किमान दोनदा आल्याची इतिहासाची साक्ष आहे. पण त्यांनीच आयत्यावेळी कच खाल्ली आणि त्यांना माघार घ्यावी लागली. दिल्लीतले त्यांचे राजकारण पूर्ण अपयशी ठरले आणि “महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही”, असे सोशल मीडिया अकाउंट वर लिहीत फक्त एकजातीय मराठा राजकारणात ते अडकून पडले. पवारांच्या ही राजकीय कारकिर्दीची अखेर “अर्श से फर्श पर” अशी झाली.
पवार आज 83 वर्षांचे आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका नंतर त्यांच्या पक्षाला कितीही मोठे यश मिळाले, तरी ते सिंगल डिजिट पेक्षा जास्त असणार नाही. त्यांचे नाव कोणीही पंतप्रधान पदासाठी सूचवण्याची शक्यता नाही. फार मोठा राजकीय चमत्कार घडून “इंडिया” आघाडी सत्तेवर आली, तर पवार फार तर सुप्रिया सुळेंच्या मंत्रीपदासाठी लॉबिंग करू शकतील, पण त्यासाठी सुप्रिया सुळे यांना त्यांना बारामती किंवा अन्य कुठल्या “सेफ” मतदारसंघातून निवडून आणावे लागेल. म्हणजेच शरद पवारांना आपल्या स्वतःच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस आपल्या मुलीला निवडून आणण्यासाठी धडपड करावी लागेल. ही पवारांच्या कारकिर्दीची अखेर असेल.
या अर्थाने कमलनाथ आणि अशोक गेहलोत हे काँग्रेसचे “अहमद पटेल” व्हायला निघाले होते, पण त्यांचे पुरते “शरद पवार” झाले, असे म्हणावे लागेल!!… कारण कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांचे राजकीय करियर असेच संपुष्टात आल्यात जमा आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App