पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन आपल्या प्रचाराचा रोख स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर वळवून एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेमके नसेवर बरोबर बोट ठेवले. त्यांनी ठाकरे + पवार आणि राहुल गांधी यांच्या “पॉलिटिकल केमिस्ट्री” मध्ये अशी काही “मेख” मारून ठेवली, की जी काढता येणे ठाकरे किंवा पवारांना फारच अवघड आहे. कारण त्यासाठी त्यांना राहुल गांधींची गॅरेंटी घ्यावी लागेल आणि ती गॅरंटी घेणे पवार किंवा ठाकरेंचा “घास” नाही!!
आता हेच पहा ना… पंतप्रधान मोदींनी दोनच दिवसांपूर्वी कल्याणच्या सभेमध्ये सावरकरांच्याच अपमानाच्या मुद्द्यावर शरद पवारांना आव्हान दिले होते. तुम्ही राहुल गांधींच्या तोंडून वीर सावरकरांविषयी पाच चांगली वाक्ये बोलवून घ्या!! निवडणुकीच्या काळात तुम्ही सावरकरांवर बोलू नका, असे तुम्हीच राहुल गांधींना “कन्व्हिन्स” केले होते ना!!, मग तसेच तुम्ही राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांविषयी पाच चांगली वाक्ये बोलवून घ्या!! एवढेच आव्हान मोदींनी पवारांना दिले होते.
यामागे शरद पवारांच्याच राजकीय कर्तृत्वाची पार्श्वभूमी होती. कारण भारत जोडो न्याय यात्रेच्या वेळी राहुल गांधींनी अकोल्यामध्ये येऊन सावरकरांना “माफीवीर” म्हटले होते. त्यासाठी त्यांनी एक कागदही पत्रकार परिषदेत फडकवून दाखवला होता, ज्याचा प्रतिवाद अभ्यासकांनी अनेकदा केला होता. पण राहुल गांधींच्या सावरकरांच्या अपमानाचा परिणाम काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला भोगावा लागला. त्यांच्यावर सोशल मीडिया चौफेर भडीमार झाला. त्यानंतर नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी इंडी आघाडीच्या नेत्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सावरकरांच्या कार्याविषयीची माहिती दिली होती.
सावरकरांनी कसे क्रांतिकार्य केले??, सामाजिक सुधारणा बाबत सावरकरांचे कार्य आणि धोरण काय होते??, यासंदर्भात पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना बरेच सुनावले होते. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवारांच्या म्हणण्याला दुजोरा देत मान हलवली होती. तशा बातम्या त्यावेळी प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या हेडलाईन्सने प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर खरंच राहुल गांधींनी सावरकरांवर बोलायचे सोडले. कुठल्याच सभेत राहुल गांधी सावरकरांचे नावही घेईनासे झाले. पंतप्रधान मोदींनी नेमका हाच मुद्दा हेरला आणि त्यांनी थेट शरद पवारांनाच कल्याणच्या सभेत आव्हान देऊन टाकले!!
कालच्या शिवाजी पार्कच्या सभेत मोदींनी हेच आव्हान वेगळ्या पद्धतीने रिपीट केले. तुम्ही नकली राष्ट्रवादीचे का होई ना, पण बडे नेते आहात ना, मग तुम्ही राहुल गांधींकडून हे वदवून घ्या, की ते सावरकरांचा कधीही अपमान करणार नाहीत, असे आव्हान मोदींनी दिले.
आता मोदींना असे आव्हान देणे सोपे आहे. किंबहुना आपल्या विरोधकांना कुठलाही नेता अशाच प्रकारे आव्हान देतच असतो. हे आव्हान अनेकदा बडे नेते परतवूनही लावत असतात, पण मोदींनी पवारांना दिलेले सावरकरांच्या अपमानाविषयीचे आव्हान हे इतके सोपे नाही. कारण तिथे पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा सोनिया गांधी यांचा सवाल नाही. तो सवाल आहे, राहुल गांधींची गॅरेंटी घेण्याचा!!
आता राहुल गांधींची गॅरंटी कोण घेणार की ते निवडणुकीनंतर सावरकरांचा अपमानच करणार नाहीत?? कारण पवार + ठाकरे किंवा सोनिया गांधी यांच्याकडे जी राजकीय प्रगल्भता आहे, आपल्याला अडचणीत आणणारे मुद्दे टाळून बोलायचे असते याची राजकीय समज आहे, ती राहुल गांधींपाशी आहे का??, या साध्या सवालचे उत्तर कायमचे नकारार्थी आहे. कारण एवढी राजकीय प्रगल्भता आणि राजकीय समज राहुल गांधींमध्ये असती तर सावरकरांचा राजकीय दृष्ट्या पूर्णपणे बाजूला पडलेला मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणलाच नसता!!
पण राहुल गांधींनी दिल्लीतल्या सभेत तो मुद्दा ऐरणीवर आणला. “मेरा नाम राहुल गांधी है, राहुल सावरकर नही. मै माफी नाही मागूंगा!!”, असे राणा भीमदेवी थाटात ते म्हणाले आणि तिथेच राहुल गांधी आणि त्यांचे सगळे सहकारी फसले.सावरकरांचा मुद्दा सतत तापत गेला. त्यावर राहुल गांधी समर्थक वगळले, तर बाकीच्या काँग्रेस नेत्यांनाही उत्तरे देणे कठीण गेले. कारण काँग्रेसचेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग यांनी सावरकरांविषयी सन्मानजनक वक्तव्ये केली, पत्रे लिहिली, याचे पुरावे सगळीकडे सोशल मीडियावर आले. प्रसार माध्यमांनाही त्याची दखल घ्यावी लागली.
पण तरी देखील राहुल आणि राहुल समर्थकांनी सावरकरांचा अपमान करणे सोडले नाही. काँग्रेसने शिदोरी मासिकात सावरकरांच्या कथित समलैंगिकतेविषयी खोटेनाटे आरोप करणारे लेख छापून आणले. त्यातून सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसचे राजकीय मूसळ पूर्ण केरातच गेले!!
आता ज्यावेळी इंडी आघाडी पूर्ण कॉर्नर झाली आहे, त्यावेळी मोदींनी सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा महाराष्ट्रात येऊन परत ऐरणीवर आणला. त्यात त्यांनी ठाकरे आणि पवारांना देखील ओढले. नेमका इथेच मुद्दा राहुल गांधींची गॅरेंटी घेण्याचा आहे. निवडणुकीपुरते राहुल गांधी गप्प बसले पण निवडणुकीनंतर ते सावरकरांचा अपमान करतीलच, असे भाकीत मोदींनी केल्याने पुन्हा एकदा पवारांवरच राहुल गांधींची गॅरेंटी घेण्याची वेळ आली.
आता ज्या पवारांना 4 जून नंतर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ येऊ शकते, ते पवार राहुल गांधींना तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका असे सांगू शकतील का?? तेवढे सांगण्याची क्षमता ते टिकवून ठेवू शकतील का??, हा खरा कळीचा सवाल आहे. त्यामुळेच मोदींनी अशी काही मेख मारून ठेवली आहे की, जी पवार किंवा ठाकरे यांना काढता येणे शक्य नाही. कारण तिथे राहुल गांधींची गॅरंटी घ्यावी लागेल, जी घेणे खुद्द सोनिया गांधींनाच शक्य नाही, तिथे पवार आणि ठाकरे राहुल गांधींची काय गॅरेंटी घेणार??
– पवारांनी टाळले मोदींचे आव्हान
वर उल्लेख केल्याप्रमाणे खरंच शरद पवार हे राहुल गांधींची गॅरेंटी घेऊ शकले नाहीत. आजच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांना सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी मोदींवरच ते चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचा आरोप करून मोदींनी दिलेले आव्हान टाळले. वीर सावरकर हा या निवडणुकीचा मुद्दा नाही. राहुल गांधी या निवडणुकीत सावरकर म्हटल्यावर कुठलीही भाष्य करत नाहीत, पण मोदी मात्र चिथावणी देणारी वक्तव्ये करतात, असा आरोप पवारांनी केला, पण भविष्यात राहुल गांधी कधीच सावरकरांचा अपमान करणार नाहीत, असे वक्तव्य तुम्ही राहुल गांधींकडून करवून घ्या, या मोदींनी दिलेल्या आव्हानावर राहुल गांधी भविष्यात कधी सावरकरांचा अपमान करणार नाहीत, असे उत्तर पवारांनी दिले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App