2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अनपेक्षित यश मिळत तब्बल 99 जागा मिळाल्या आणि पक्षामध्ये “मॅजिक ऑफ 99” घडले!! काँग्रेसमध्ये एकदम जबरदस्त जोश संचारला. राहुल गांधींची “पप्पू” प्रतिमा पुसट होऊन एक “लढवय्या नेता” म्हणून त्यांची प्रतिमा विकसित होऊ लागली आणि काँग्रेसजनांना आनंदाचे भरते आले. या आनंदाच्या भरात त्यांनी धडाधड अंतर्गत बैठकांचा जोर लावला आणि काल सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी INDI आघाडीतल्या नेत्यांची बैठक घेतली.INDI alliance partners apply break government formation under rahul gandhi
या बैठकीमध्ये पण प्रचंड उत्साह होता. या बैठकीला अखिलेश यादव, शरद पवार, तेजस्वी यादव, एम. के. स्टालिन, ओमर अब्दुल्ला यांच्यासह 26 पक्षांचे नेते पोहोचले. ममता बॅनर्जींनी देखील त्या बैठकीला पाठिंबा दिला. त्यामुळेINDI आघाडीच्या नेत्यांच्या बाहुंमध्ये जबरदस्त बळ संचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव झालाच आहे, आता आपण संख्याबळ जमवले की, आता आपलेच सरकार येणार आहे, याची खात्री या सगळ्या नेत्यांना वाटायला लागली!!
पण तेवढ्यात बातमी आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनविण्याचा घाट घातला. तिथे पहिली माशी शिंकली. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडे 294 खासदार असल्याचा आकडा समोर आला.
“इंडी” आघाडीच्या “जोश” भरलेल्या नेत्यांना थोडा “होश” आला. त्यामुळे “इंडी” गाडीच्या बैठकीतली भाषा थोडी बदलायला सुरुवात झाली. त्यातच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे काँग्रेस मधून राहुल गांधींचे नेतृत्व झपाट्याने पुढे आले. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसच्या जागा “प्रचंड” वाढल्या आणि त्यांनी 54 वरून एकदम 99 वर उडी घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधींचे नेतृत्व “अतिप्रिय” वाटू लागले मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बैठकीच्या ठिकाणी स्वतः सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे हजर होतेच. त्यामुळे काँग्रेसची ताकद त्या बैठकीत दिसली आणि तिथे खऱ्या अर्थाने आघाडीचे “चाणक्य” नेते सावध झाले. त्यांच्या डोळ्यासमोर एकदम काँग्रेसच्या वर्चस्वाचे सरकार चमकून गेले!!
मूळात काँग्रेस प्रणित “इंडी” आघाडी बनवली, ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला पराभवाचा दणका देण्यासाठी, राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी नव्हे हे त्यांच्या लगेच लक्षात आले!! आता “इंडी” आघाडी बनवून नरेंद्र मोदींच्या भाजपला जो काही दणका द्यायचा आहे, तो दणका देऊन झाला आहे, त्यामुळे आघाडीतल्या घटक पक्षांच्या खासदार संख्येच्या बळावर राहुल गांधींना पंतप्रधान करून करण्याची कल्पनाही “इंडी” आघाडीच्या नेत्यांना सहन झाली नाही आणि त्यांनी काँग्रेसच्या जोशाच्या गॅस भरलेल्या फुग्याला टाचणी लावली. त्यामुळे ‘इंडी” आघाडीच्या बैठकीतली सगळी चर्चा फिरून गेली. आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी “होश” सांभाळला आणि त्यामुळेच मल्लिकार्जुन खर्गे यांना “आम्ही योग्य वेळेची वाट पाहू”, असे बाहेर येऊन पत्रकारांना सांगावे लागले.
अन्यथा काँग्रेसची राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्याची धडपड सुरूच राहिली होती. किंबहुना आपल्या पक्षात संचारलेला जोश “इंडी” आघाडीतल्या इतर घटक पक्षांवर लादायचा त्यांचा मनसूबा होताच, पण “इंडी” आघाडीतले बाकीचे घटक पक्षांचे नेते लगेच सावध झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या इराद्याला “ब्रेक” लावला, ही खरी “इंडी” आघाडीच्या बैठकीची “इनसाईड स्टोरी” ठरली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App