माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे उद्गार; कन्या शर्मिष्ठा मुखर्जींचा निर्वाळा
नाशिक : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डायऱ्या आणि त्यावर आधारित त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींचे पुस्तक दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजवते आहे. प्रणव मुखर्जींनी राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग यांच्या विषयी लिहिलेल्या नोंदी आणि काढलेले उद्गार यावर देशातल्या बुद्धिमंत वर्तुळात भरपूर चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे काँग्रेस कार्यकर्ते शर्मिष्ठा मुखर्जींना ट्रोल करत आहेत. In 1948 if Indira Gandhi would have been prime minister instead of Nehru, entire Kashmir would have been ours, said Pranab Mukherjee!!
पण त्या पलीकडे जाऊन शर्मिष्ठा मुखर्जींच्या पुस्तकातून आणखी काही वेगळे आणि धक्कादायक खुलासेही होत आहेत. शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रणव, माय फादर; ए डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक केवळ प्रणव मुखर्जींच्या 51 डायऱ्यांना आधार मानूनच लिहिले असे नाही, तर त्यांच्याशी झालेली वेगवेगळी संभाषणे देखील त्यांनी या पुस्तकात आवर्जून नोंदविली आहेत.
इंदिरा गांधींनंतर देशातल्या जनतेची नाडी कोणी ओळखली असेल, तर ती मोदींनीच; लिहिलंय प्रणवदांनी!!
यातलेच एक महत्त्वाचे संभाषण शर्मिष्ठा मुखर्जींच्या एका मुलाखतीतून समोर आले आहे. शर्मिष्ठा मुखर्जींनी प्रणवदांना त्यांच्यावर असलेल्या राजकीय प्रभावा विषयी विचारले असता, त्यांनी नि:संदिग्धपणे इंदिरा गांधींचे नाव घेतले. इंदिरा गांधींनी आपल्याला सर्व प्रकारची शिकवण दिली. अगदी आंतरराष्ट्रीय फोरमवर पोशाख कसा करावा, ते मुत्सद्देगिरीचे सर्व बारकावे इंदिराजींनीच आपल्याला समजावून सांगितले. आपल्या जीवनाला राजकीय वळण लावले, असे सांगितले. पण ज्यावेळी शर्मिष्ठा मुखर्जींनी तुम्हाला भारताचे सर्वश्रेष्ठ पंतप्रधान कोण वाटतात??, असा प्रश्न विचारल्यावर प्रणवदांनी तात्काळ उत्तर दिले होते, “पंडित जवाहरलाल नेहरू.” होय, पंडित नेहरू हेच भारताचे सर्वश्रेष्ठ पंतप्रधान होते. त्यांच्या जवळपासही बाकीचे कोणी पंतप्रधान पोहोचले नाहीत. इंदिरा गांधींकडे स्वतःचे काही गुण निश्चित होते. पण त्या देखील पंडितजींपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत!!
अर्थात 1948 मध्ये “त्या”वेळी, (म्हणजे पाकिस्तान निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या युद्धाच्या वेळी) जर पंडितजींच्या ऐवजी इंदिराजी पंतप्रधान असत्या, तर संपूर्ण काश्मीर तेव्हाच भारताचा अविभाज्य भाग झाले असते, हे परखड मत नोंदवून प्रणव मुखर्जींनी लगेच विषय बदलला होता, असे शर्मिष्ठा मुखर्जींनी या मुलाखतीत सांगितले.
शर्मिष्ठा मुखर्जींच्या मुलाखतीतला हा अत्यंत महत्त्वाचा भाग माध्यमांनी फारसा प्रकाशात आणला नाही. राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या बद्दल प्रणवदांनी नोंदविलेल्या निरीक्षणांवरच माध्यमांनी फोकस केला.
पण प्रणव मुखर्जींसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुत्सद्द्याने पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन पंतप्रधान पिता आणि कन्या यांच्या विषयी मांडलेले मत दोन पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वातला, धोरणातला आणि आक्रमकतेतला भेद उलगडून तर सांगतेच, पण निर्णायक क्षणी घाव घालण्याची इंदिरा गांधींची क्षमताही अधोरेखित करून जाते!!
प्रणव मुखर्जींवर इंदिरा गांधींचा विलक्षण प्रभाव होता आणि ते अखेरपर्यंत “इंदिरा लॉयलिस्टच” होते, हे शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितले, पण त्या पलीकडे जाऊन इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या धोरणाची चिकित्सा करण्याची अभ्यासू वृत्ती देखील प्रणवदांमध्ये होती, असेही दाखवून दिले. प्रणवदांच्या डायऱ्या आणि त्यावर आधारित पुस्तक आणि त्यानंतरची मुलाखत यातल्या या महत्त्वाच्या मुद्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App