विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत घेण्यात आलेल्या एका उल्लेखनीय निर्णयात, 2024-25 साठी भारताचे अधिकृत नामांकन म्हणून, ‘भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले ‘ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ही मान्यता मिळवणारी भारताची ही 44 वी स्थळे बनली आहेत. ही जागतिक प्रशंसा भारताच्या चिरंतन सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करते ज्यामधून त्याच्या स्थापत्य प्रतिभेच्या, प्रादेशिक अस्मितेच्या आणि ऐतिहासिक सातत्यतेच्या विविध परंपरा प्रदर्शित होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक यशाचे कौतुक केले आणि या कामगिरीबद्दल भारतातील जनतेचे अभिनंदन केले.
17 ते 19 व्या शतकापर्यंत विस्तारलेले बारा किल्ल्यांचे हे अभूतपूर्व जाळे मराठा साम्राज्याचा धोरणात्मक लष्करी दृष्टीकोन आणि स्थापत्य कौशल्याचे दर्शन घडवते.
जानेवारी 2024 मध्ये जागतिक वारसा समितीकडे हा प्रस्ताव विचारार्थ पाठवण्यात आला होता आणि सल्लागार संस्थांसोबत अनेक तांत्रिक बैठका आणि स्थळांचा आढावा घेण्यासाठी आयकोमॉसच्या मोहिमेने दिलेल्या भेटी नंतर अठरा महिन्यांच्या कठोर प्रक्रियेनंतर, जागतिक वारसा समितीच्या सदस्यांनी आज संध्याकाळी पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यांमध्ये विस्तारलेल्या निवडक स्थळांमध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
सागरी किनारे ते डोंगरावरील किल्ल्यांपर्यंत विविध भूभागांमध्ये वसलेल्या किल्ल्यांच्या बांधणीवरून मराठा साम्राज्याच्या एकत्रित लष्कराचे परिदृश्य तयार होते. भारतातील तटबंदी परंपरांच्या नावीन्यपूर्ण आणि प्रादेशिक अनुकूलतेवर या किल्ल्यांची बांधणी प्रकाश टाकते.
साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, राजगड आणि जिंजी हे डोंगराळ प्रदेशात वसलेले किल्ले आहेत आणि म्हणूनच त्यांना डोंगरी किल्ले म्हणून ओळखले जाते. घनदाट जंगलात वसलेला प्रतापगड याचे डोंगरी-वन किल्ला म्हणून वर्गीकरण केले जाते. पठारावरील टेकडीवर स्थित पन्हाळा हा डोंगरी-पठारावरचा किल्ला आहे. किनाऱ्यालगत असलेला विजयदुर्ग हा एक उल्लेखनीय किनारी किल्ला आहे. तर समुद्राने वेढलेले खांदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बेटावरचे किल्ले म्हणून ओळखले जातात.
फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या अधिवेशनात यासंबंधीचा मजकूर तयार करण्यात आला. हा एक भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाला मिळालेल्या जागतिक मान्यतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
वारसा समितीच्या बैठकीत, 20 पैकी 18 पक्षांनी या महत्त्वाच्या स्थळाला यादीत समाविष्ट करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या प्रस्तावावरील चर्चा 59 मिनिटे चालली आणि 18 सकारात्मक शिफारशींनंतर, सर्व सदस्य राष्ट्रे, युनेस्को, जागतिक वारसा केंद्र आणि युनेस्कोच्या सल्लागार संस्था (ICOMOS, IUCN IUCN) यांनी, या महत्त्वपूर्ण संधीबद्दल भारतीय शिष्टमंडळाचे अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App