नाशिक : अण्णामलाई यांनी भाजप सोडल्याचा पहिला फटका आजच पक्षाच्या संघटनेला बसला. एका युवा नेत्याने भाजपचा राजीनामा देऊन अण्णामलाई यांना साथ द्यायचा निर्णय घेतला.
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भरपूर विचार मंथन करून अण्णामलाई यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्याआधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दोन वेळा चर्चा केली. भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्याशी सुद्धा विचार विनिमय केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये आणि अण्णामलाई यांच्या दृष्टिकोनामध्ये कमालीची तफावत असल्याने अण्णामलाई यांनी “शांतपणे” भाजपमधून बाजूला व्हायचा निर्णय घेतला. आज त्यांनी तो निर्णय अंमलात आणला. तामिळनाडूमध्ये नवी राजकीय चळवळ उभारण्याचा संकल्प केला. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना तामिळ जनतेला समजेल, अशा भाषेत संवाद साधता येत नाही. या नेत्यांना तमिळ जनतेचे समाधान करता येत नाही, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
– अभिलाष गोपीनाथचा राजीनामा
त्या नंतर अण्णामलाई यांच्या राजीनाम्याचा भाजपला तामिळनाडूमध्ये पहिला फटका बसला. तामिळनाडू भाजप युवा मोर्चाचे निमंत्रक अभिलाष गोपीनाथ यांनी आपल्या पदाचा आणि भाजपचा राजीनामा दिला. त्यांनी अण्णामलाई यांना साथ द्यायची घोषणा केली.
– केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद
तामिळनाडू मध्ये आधीच राजकीय दृष्ट्या दुबळ्या असलेल्या भाजपला अण्णामलाई यांनी बऱ्यापैकी स्थान मिळवून दिले होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा सुरुवातीला त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, पण अण्णामलाई यांनी भाजपने विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढावे अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमशी युती करू नये अशी सूचना केली. ती सूचना मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मान्य केली नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाचा फटका पक्षाला तामिळनाडूत बसला. अण्णामलाई आणि भाजपच्या संघटनेने कष्टाने अकरा टक्के मते मिळवली होती, ती घसरून दोन टक्क्यांवर आली. त्यामुळे अण्णामलाई यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयातून भ्रमनिरास झाला होता.
– दुबळ्या भाजपला खिंडार
अण्णामलाई यांनी स्वतंत्रपणे तामिळनाडूचे राजकारण हाताळायचा निर्णय घेतला. त्यांना आज पहिली साथ भाजपमधूनच मिळाली. अभिलाष गोपीनाथ हे भाजप सोडून अण्णामलाई यांच्याबरोबर आले. त्यामुळे आधीच दुबळ्या असलेल्या भाजपच्या संघटनेला तामिळनाडूमध्ये आणखी मोठे खिंडार पडले.
– दिल्ली चर्चा, पण पक्षाला खिंडार
याच दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तामिळनाडू भाजपच्या नेत्यांना दिल्लीत चर्चेसाठी पाचारण केले. तामिळनाडू कमकुवत असलेली पक्ष संघटना कशी वाचवायची आणि नंतर ती कशा पद्धतीने वाढवायची, याविषयी केंद्रीय नेतृत्वाने तामिळनाडूच्या नेत्यांना काही सल्ला दिल्याची बातमी प्रसार माध्यमांनी दिली. पण तामिळनाडूतले नेते दिल्लीतून पुन्हा तामिळनाडू येऊन दाखल होण्यापूर्वीच पक्षाला खिंडार पडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App