मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसमध्ये दलित पंतप्रधानांची चर्चा; पण आधी कोणी आणला होता दलित पंतप्रधानांमध्ये अडथळा??, असे विचारायची वेळ काँग्रेस पक्षातल्याच चर्चेने आणली आहे. Dalit prime minister : not only mallikarjun kharge, but babu jagjivan ram was also contemplating for the post, but didn’t succeed
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने दलित पंतप्रधानांची चर्चा आजतरी उघड नव्हे, तर सुप्त स्वरूपात आहे. ही चर्चा काहीशी उघड करण्याचे धाडस त्यांच्याच विरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक लढविलेल्या खासदार शशी थरूर यांनी केले आहे. काँग्रेसमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान पद स्वीकारले नाही, तर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने पहिले दलित पंतप्रधान होऊ शकतात, असे वक्तव्य शशी थरूर यांनी केले आहे. या वक्तव्यावर काँग्रेसमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटलेले नाहीत, पण काँग्रेसमध्ये दलित पंतप्रधानांची चर्चा ही केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांच्याच नावाने झाली, असे मानण्याचे कारण नाही. कारण तसा राजकीय इतिहास नाही. यापूर्वी देखील काँग्रेसमध्ये दलित पंतप्रधानांची चर्चा जरूर झाली होती आणि ती केवळ काही दिवसांपूर्वी मर्यादित नव्हती, तर ती अनेक वर्षे सुरू होती. शेवटी त्या दलित नेत्याला, “इस मुल्क में चमार कभी प्राईम मिनिस्टर नही बन सकता,” असे म्हणावे लागले होते!!
काँग्रेसमध्ये दलित पंतप्रधानांची चर्चा झाली होती, ती बाबू जगजीवन राम यांच्या भोवती!! बाबूजी तेव्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते आणि पंतप्रधान पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते सर्वात वरिष्ठ मंत्री देखील राहिले होते. पंडितजींच्या मंत्रिमंडळात ते खूप वरिष्ठ मंत्री नव्हते, कारण त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित गोविंद वल्लभ पंत, लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री होते. या सर्व नेत्यांना बाबू जगजीवन राम हे ज्युनियर होते.
पण पंडित नेहरूंनी स्वतःच्या राजकीय कॅल्क्युलेशन्स नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय अस्तित्वाला काटशह म्हणून बाबू जगजीवन राम यांची निवड आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात केली होती आणि ती नंतर कायमही ठेवली होती.
त्यानंतर बाबूजींनी आपल्या राजकीय कर्तृत्वावर लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात स्थान टिकवून ठेवले होते. सीनियॉरिटीच्या बळावर आपल्याला कधी ना कधीतरी पंतप्रधान पदाची संधी येईल, असे कोणत्याही राजकारण्याला वाटते तसे बाबू जगजीवन राम यांना देखील वाटत होते.
1969 मध्ये काँग्रेसमधल्या सिंडिकेट – इंडिकेटवादाच्या वेळी त्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळेल असे वाटले होते, पण त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी देखील देण्याचे घाटत होते. यानिमित्ताने इंदिरा गांधींना बाबूजींच्या रूपाने आपल्यासमोर उभा असलेला पंतप्रधान पदाचा तगडा राजकीय कॅंडिडेट हटविण्याची संधी होती, पण इंदिरा गांधी त्यावेळच्या राजकारणात इतका “स्वतंत्र” निर्णय घेण्याची क्षमता नव्हती.
वास्तविक 1969 मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या वर्षात दलित व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. पण तो युक्तिवाद त्यावेळच्या सिंडिकेट म्हणजेच काँग्रेसच्या अतिवरिष्ठ नेत्यांना रुचला नव्हता. त्यामध्ये कामराज मोरारजी देसाई, एस. निजलिंगप्पा यांच्यासारखे दिग्गज नेते होते. बाबू जगजीवन राम यांना राष्ट्रपतीपदी बसवून इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकेल, असा तगड्या क्षमतेचा नेता “ऍक्टिव्ह पॉलिटिक्स” मधून बाजूला काढण्याची या नेत्यांची तयारी नव्हती. त्यामुळे बाबूजींचे राष्ट्रपतीपद हुकलेच, पण नंतरच्या काळात त्यांचे पंतप्रधान पदही कायमचे हुकले.
इंदिरा गांधींना बाबूजी 1977 पर्यंत आव्हान देऊ शकले नाहीत. आणीबाणीच्या काळात 1975 ते 1977 या दोन वर्षांमध्ये बाबू जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते इंदिरा गांधींपुढे तोंड उघडण्याच्या क्षमतेचे देखील राहिले नव्हते. त्यांनी स्वतःची राजकीय हिंमत इंदिरा गांधी पुढे गमावली होती.
पण 1977 मध्ये इंदिरा गांधींची राजवट संपुष्टात आली त्यानंतर बाबू जगजीवन राम यांची पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा पुन्हा फुलून आली. पण त्यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आपले राजकीय वजन मोरारजी देसाई यांच्या पारड्यात घातले आणि त्यामुळे बाबूजींचे पंतप्रधान पद पुन्ह हुकले आणि त्यावेळीच बाबूजी उद्गारले होते, “इस मुल्क मे चमार कधी प्राईम मिनिस्टर नही बन सकता!!”
राजकीय हत्यारे वापरण्यात यशापयश
इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांनी बाबू जगजीवन राम यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वेगवेगळी राजकीय हत्यारे वापरून सीमित ठेवण्यात यश मिळवले होते. कधी त्यांचे इन्कम टॅक्सचे प्रकरण बाहेर काढण्यात आले, तर कधी त्यांचा मुलगा सुरेश कुमार याचे विवाहबाह्य संबंधांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले, पण बाबूजींना इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्याविरुद्ध अशी कोणतीही राजकीय हत्यारे वापरता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मातही करता आली नाही.
हा देशातल्या दलित पंतप्रधानाभोवती फिरलेल्या चर्चेचा थोडक्यात गोषवारा आहे. त्यामुळे आजही मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भोवती भारताचे पहिले दलित पंतप्रधान म्हणून राजकीय चर्चा फिरत असली तरी, सोनिया गांधी, राहुल गांधी अथवा प्रियांका गांधी यांना पंतप्रधान व्हायचे नाही, म्हणून त्यांचे नाव पुढे केले गेले असे म्हणावे लागेल.
भाजपशी लढताना स्वतंत्र डाव
त्याचबरोबर भाजपशी लढताना एक स्वतंत्र राजकीय डाव म्हणूनही त्याकडे पहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी देशात हिंदुत्व, ओबीसी राजकारण आणि महिला आरक्षण अशी 3 प्रबळ हत्यारे घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. मोदींच्या या “राजकीय त्रिशूलाला” जातनिहाय जनगणनेच्या “बाणाचे” प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी चालविला आहे, पण तो यशस्वी होईलच, अशी कोणतीही गॅरंटी विरोधकांकडे नाही. त्यामुळे कदाचित मोदींच्या “ओबीसी पंतप्रधान” या कार्डाविरुद्ध काँग्रेसचे “दलित पंतप्रधान” हे कार्ड चालविण्याचा गांधी परिवाराचा विचार असूही शकेल, पण त्यातला मुख्य भाग मात्र सोनिया, राहुल अथवा प्रियांका गांधी यांचे पंतप्रधान पद शक्य नाही म्हणूनच दलित पंतप्रधानाचे कार्ड खेळणे हा असेल, ही राजकीय वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App