विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि संयुक्त अरब अमितरातील अबुधाबी विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्यामुळे निर्माण झालेला तणाव यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीनी सात वर्षांतील उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 87 डॉलरच्या पुढे गेली आहे. यापूर्वी जानेवारी 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 87 डॉलरच्या वर गेल्या होत्या.Crude oil prices hit seven-year high, 87 per barrel
१ डिसेंबर २०२१ रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ ६८.८७ होती. ती आता प्रति बॅरल $ 86 च्या वर पोहोचली आहे. दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती 26 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 90 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे येत्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन ते तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
रुपयांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची किंमत, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे वसुल केला जाणारा कर, देशांमध्ये इंधनांची मागणी यावर पेट्रोल-डिझेलच्या किंमती अवलंबून असतात.
अंदाजानुसार, जर कच्च्या तेलाचा भाव 10 डॉलर प्रति बॅरल वाढला तर यातून राजकोषीय घाट्यात 10 बेस पॉइंटची वाढ होते. यामुळे महागाई देखील वाढते, ज्यामुळे व्याजदर वाजवी ठेवणे आरबीआयला कठीण होईल. निर्यात बिल वाढल्यामुळे डॉलरचा साठा कमी होईल, ज्यामुळे रुपया कमजोर होईल.
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. दुसºयाच दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आणि अनेक राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले.
त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. गेल्या 75 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. याच काळात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
अजुनही केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोलवर भरमसाठ कर आकारत आहेत. पेट्रोलची मूळ किंमत सध्या 48 रुपये आणि डिझेलची किंमत 49 रुपये आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये उत्पादन शुल्क आकारत आहे. यानंतर राज्य सरकारे स्वत:च्या हिशोबाने व्हॅट आणि सेस आकारतात, त्यानंतर त्यांची किंमत मूळ किंमतीच्या 2 पट च्या जवळपास पोहोचते.
आपण आपल्या गरजेच्या 85 टक्के पेक्षा जास्त कच्च्या तेलाची खरेदी बाहेरून करतो. त्याची किंमत आपल्याला डॉलरमध्ये मोजावी लागेल. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आणि डॉलरच्या मजबूतीमुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ लागतात. कच्चे तेल बॅरलमध्ये येते. एक बॅरल म्हणजेच 159 लिटर कच्चे तेल असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App