विशेष प्रतिनिधी
नाशिक : प्रभू रामचंद्र यांनी वास्तव्य केलेल्या पवित्र नाशिक नगरीत आणि गोदातीरी पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार मला प्रदान करण्यात आला, हे मी माझे परमभाग्य समजतो. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला. आता काशी – मथुरा तीर्थस्थळांसारखे इतर प्रश्न सोडवण्यासाठी या पुरस्काराने मला निश्चितच मोठे बळ मिळेल, असा विश्वास थोर राष्ट्रीय संत आणि अयोध्येतील श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केला. confidence to Govinddev Giri Maharaj
नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणे तसेच धर्म समाज आणि राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंददेवगिरी महाराज यांना शुक्रवारी (दि. 31 मे 2024) सायंकाळी रामतीर्थ गोदाघाट (पाडवा पटांगण) येथे शानदार सोहळ्यात विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य तसेच नाथ परंपरेचे 18 वे पीठाचार्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि इस्कॉन संचालन समितीच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य तसेच इस्कॉनच्या गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग प्रभुजी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना गोविंद गिरीजी महाराज बोलत होते.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि महादक्षिणा असे पुरस्काराचे स्वरूप होते. नाशिककरांतर्फे माधवदेव गिरी महाराज यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. यावेळी श्रीरामाच्या जयघोषाने पवित्र गंगा गोदावरीचा परिसर दणाणाला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत स्वप्नीलराजे होळकर प्रमुख उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. वैभव जोशी आणि विजय जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्शवादाची जोपासना करण्याची गरज स्वप्निल राजे होळकर यांनी व्यक्त केली.
आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या भाषणात प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. नाशिक ही संतांची पुण्यभूमी आहे. नाशिककरांच्या आंतरिक सादाला साथ देऊन पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांनी महादेव गिरी महाराज यांचे कौतुकही केले. गौरांग प्रभू यांनीही आपल्या भाषणात नाशिकनगरीचे महत्व विषद करून माधवगिरी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले.
प. पू. गोविंद देवगिरीजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेचे उपाध्यक्ष आहेत.श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांनी अपार कष्ट उपसले. सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा देश विदेशात प्रसार करण्याचे व्रत घेऊन त्यांनी घरोघरी श्री भगवद्गीता पोहोचविली आहे. हिंदू बांधवांसाठी वेदांतील ज्ञानसागर खुला व्हावा यासाठी देशभरात वेद पाठशाळा सुरू करून तसेच सनातन धर्माला अनुलक्षून त्यांनी जनमानसाला वेददीक्षा दिली आहे. त्यामुळेच त्यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे, असे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया आणि स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.
स्वानंद बेदरकर यांनी आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावर भक्तीचरणदास महाराज हे उपस्थित होते. यावेळी नरेंद्र कुलकर्णी, आशिमा केला, वैभव क्षेमकल्याणी, विजय भातांबरेकर, शिवाजी बोंदार्डे, प्रेरणा बेळे, रणजित सिंग आनंद, विजय जोशी, रामेश्वर मलानी, उदयन दीक्षित, राजेंद्रनाना फड, गुणवंत मणियार आदी उपस्थित होते. हजारो नाशिककरांनी उपस्थित राहून हा आनंद सोहळा अनुभवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App