एकीकडे INDI आघाडीतले नेते एकमेकांमध्येच फूटपाडे वर्तन करत असताना दुसरीकडे देशातल्या प्रत्येक मतदारसंघात 51 % मतांचे भाजपने मिशन ठेवले आहे. भाजपचे 2 दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राजधानीतील बाराखंबा रोडवरील पक्षाचे मुख्यालयात झाली.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी प्रामुख्याने संबोधित केले. देशातल्या प्रत्येक प्रदेशाध्यक्षाने आपापल्या राज्याचे प्रेझेंटेशन केले. BJP sets mission of 51 % votes in all loksabha constituencies in the country
या मंथनातून भाजपने देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 51 % मते मिळवण्याचे मिशन ठेवले आहे. भाजपला लोकसभेत 272 चे पूर्ण बहुमत मिळावे, पक्षाने 350 टप्पा गाठावा, हे पक्षाचे मिशन जुने झाले. त्या पलीकडे झेप घ्यायची असेल, तर मोठे मिशन ठेवावे लागेल हे लक्षात घेऊनच पक्षाच्या नेतृत्वाने पुढच्या फळीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देशाच्या लोकसभेत देशाच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 51% मते खेचून आणण्याचे टार्गेट दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या चार जातींवर लक्ष केंद्रित करा असे आग्रहपूर्वक आवाहन केले. यातून मोदींनी INDI आघाडीच्या जातनिहाय राजकारणाला छेद दिला. देशातल्या सर्व जाती गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या 4 जातीवर्गांमध्येच समाहित आहेत, असे प्रतिपादन केले.
51 % मतांच्या मिशनचा खरा अर्थ
पण त्या पलीकडे जाऊन भाजपने जे 51 % मते मिळवण्याचे मिशन ठेवले आहे, त्याचा खरा अर्थ हा 2024 नंतरच्या पक्षाच्या आणि देशाच्या भविष्यातल्या राजकीय व्यूहरचनेशी जास्त संबंधित आहे. देशात फक्त 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका होणार नाहीत, तर त्यानंतरच्या सर्व निवडणुका या विस्तारित संख्येच्या मतदारसंघांमध्ये होणार आहेत. 2026 मध्ये लोकसभेचे मतदारसंघ, तसेच वेगवेगळ्या राज्यांचे विधानसभा मतदारसंघ यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याचा अर्थ संख्यात्मक पातळीवरच देशात लोकशाहीचा विस्तार होणार आहे. अशावेळी केवळ 2024 चे बहुमत जिंकण्याचे अथवा 350 जागांच्या टप्पा गाठण्याचे मिशन हे विशिष्ट काळापुरतेच मर्यादित आणि संकुचित ठरू शकते, हे भाजप नेतृत्वाने लक्षात घेतले आहे.
भाजपला दीर्घकालीन आणि दीर्घसूत्री राजकारण करायचे असेल, तर 2026 नंतरच्या देशांतर्गत Geo politics चा विचार करावा लागेल. याचा अर्थ वाढलेले लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यांचा विचार करूनच टार्गेट निश्चित करावे लागेल, याकडे भाजप श्रेष्ठींनी नेमके लक्ष पुरविले आहे. कारण 2026 हे वर्ष फार दूर नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर, तर अवघ्या 1.5 वर्षात लोकसभेच्या तसेच विधानसभांच्या मतदारसंघांच्या संख्यावाढीचे, रेखांकनाचे आव्हान नव्या सरकारला पेलावे लागणार आहे. त्यासाठी लोकसंख्या, वेगवेगळ्या जात समूहांच्या रचना राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक आशा-आकांक्षा यांचा बारकाईने विचार करावा लागणार आहे.
त्याचवेळी देशातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपला पक्ष संघटनेचा खूप मोठा विस्तार करावा लागणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात 51 % मते खेचून आणण्याच्या मिशन मागचे हे खरे राजकीय इंगित आहे. देशाच्या Geo politics चा विचार करता ते अपरिहार्य देखील आहे.
INDI आघाडीतल्या नेत्यांची सुरुंग पेरणी
पण या पार्श्वभूमीवर INDI आघाडीतले घटक पक्ष मात्र 2024 पुरताच मर्यादित विचार करताना देखील आपापसातच राजकीय भांडण लावण्याचे सुरुंग पेरून ठेवत आहेत.
यातला पहिला सुरूंग ममता बॅनर्जींनी INDI आघाडीच्या अशोका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत पेरला. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले आणि सोनिया गांधी, नितीश कुमार, राहुल गांधी प्रियांका गांधी, शरद पवार यांचे “पापड मोडले.”
DMK च्या नेत्यांनी हिंदी भाषकांविरुद्धची गरळ ओकणे तीव्र केले. उत्तर प्रदेश आणि बिहार मधून हिंदी शिकून येणारे तामिळनाडूत टॉयलेट साफ करतात, असे संताप आणि अपमान जनक वक्तव्य दयानिधी मारन यांनी केले. त्यातून भाजप टार्गेट होण्याऐवजी INDI आघाडीतलेच घटक पक्ष टार्गेट होतील, हे माहिती असूनही DMK पक्षाच्या नेत्यांनी आपली ही सुरुंग पेरणी थांबवलेली नाही.
शरद पवारांनी बारामतीत गौतम अदानी यांची स्तुती करून INDI आघाडीत तिसरी सुरुंग पेरणी करून ठेवली. विद्या प्रतिष्ठानच्या टेक्नॉलॉजी सेंटरसाठी त्यांनी गौतम अदानींकडून 25 कोटींची देणगी स्वीकारली.
अर्थात ममता बॅनर्जींनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले म्हणूनच केवळ ही सुरुंग पेरणी झाली असे नाही, तर त्यांनी अथवा दुसऱ्या कुणीही दुसरे कोणतेही नाव सुचवले असते तरी, ती सुरुंग पेरणी झालीच असती. कारण इंडिया गाडीत वर उल्लेख केलेले सर्वच उमेदवार नेते हे स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार समजतात.
INDI आघाडीकडे काटशहाची योजना नाही
ज्यावेळी भाजप प्रत्येक मतदारसंघांमध्ये 51 % टक्के मते मिळवण्याचे टार्गेट ठेवतो आहे, त्याला काटशह देण्यासाठी INDI आघाडीकडे कोणतीही उपाययोजना नाही. 2026 चा तर ते विचारही करू शकत नाहीत. मग भले जयंत पाटलांनी, शरद पवारांना ते द्रष्टे नेते आहेत. आपण जेव्हा 2024 च्या निवडणुकीचा विचार करतो, त्यावेळी ते 2034 च्या निवडणुकीचा विचार करतात असे वक्तव्य केले असेल, तरी प्रत्यक्षात 2034 तर सोडाच 2024 च्या निवडणुकीपूर्वी आपणच स्थापन केलेला पक्ष हातातून निसटून चालल्याची त्यांना पाहावे लागतेय ही राजकीय वस्तुस्थिती आहे. एवढे असूनही त्यांची अदानी स्तुती थांबलेली नाही. यातूनही INDI आघाडीत जी सुरुंग पेरणी व्हायची, ती झालीच आहे. आता फक्त मोठा राजकीय स्फोट होण्याचाच अवकाश आहे, INDI आघाडीचे विसर्जन ठरलेलेच आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App