देशाच्या राजकीय इतिहासात एका घटनेची 49 वर्षांनंतर पुनरावृत्ती होत आहे. INDI आघाडीला नव्या “जेपींचा” शोध लागला आहे आणि काँग्रेसची मात्र त्यांच्या मागे तशीच फरफट सुरू आहे.
1975 मध्ये जे जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण होते, त्यांच्यावर तत्कालीन इंदिरा सरकार भ्रष्टाचाराचे आरोप लावणे तर सोडाच, पण एखादा काळा डागही लावण्याची हिंमत करू शकले नव्हते. कारण त्यांचे वर्तन तितके स्वच्छ होते. त्याउलट आत्ताच्या INDI आघाडीच्या नव्या जेपींवर केवळ भ्रष्टाचाराचे आरोपच नाहीत, तर ते भ्रष्टाचाराच्या डांबराच्या बॅरेल मध्ये अखंड बुडाले आहेत. दिल्लीतल्या दारूपासून पाण्यापर्यंतचा भ्रष्टाचार टँकर मधून वाहतो आहे आणि त्या टँकर लॉबीचे हे “नवे जेपी” मालक आहेत. आता 49 वर्षानंतर जरी इतिहासाची पुनरावृत्ती होत असली, तरी काळाच्या ओघात जेपींचा स्तर एवढा खाली जाणे “अपेक्षितच” आहे. पण जी विरोधकांची INDI आघाडी “नव्या जेपींच्या” शोधात होती, तो शोध मात्र आज पूर्ण झाला. अरविंद केजरीवालांच्या रूपाने INDI आघाडीला नवा जयप्रकाश नारायण मिळाला आणि त्यामागे काँग्रेसची फरफट तशीच सुरू राहिली.
– जेपींचा नैतिक प्रभाव
1975 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी उभारलेले आंदोलन कुठल्याही प्रकारे दाबता येत नाही, जयप्रकाश नारायण यांचा नैतिक प्रभाव रोखता येत नाही किंवा तो झुगारताही येत नाही म्हणून इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. जयप्रकाश नारायण यांच्या सकट सगळ्या विरोधकांना बिन आरोपाचे तुरुंगात डांबले. किंबहुना संपूर्ण देशाचा त्यांनी तुरुंगा केला. एक प्रकारे इंदिरा गांधींच्या राजकीय स्खलनामुळे काँग्रेसची जयप्रकाश नारायण यांच्या मागे फरफट झाली. त्याची अंतिम परिणिती इंदिरा गांधींच्या पराभवात झाली होती. कारण इंदिरा गांधींनी जेपींवर अन्याय अत्याचार केला हे जनतेच्या लक्षात आले आणि जनतेने मतपेटी द्वारे त्या अन्यायाचे उत्तर देऊन इंदिरा गांधींना पराभूत केले होते. त्यावेळी जयप्रकाश नारायण जिंकले होते.
त्या उलट आता अरविंद केजरीवाल यांना मोदी सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले आहे. ते तसे एकटेच तुरुंगात गेलेले नाहीत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरे दिल्लीचे बाकीचे तीन-चार मंत्री अशाच भ्रष्टाचाराच्याच आरोपात तुरुंगाची हवा खात आहेत, पण INDI आघाडीला “नवा जेपी”च मिळत नव्हता. कितीही शोध घेतला, तरी तो सापडतच नव्हता. तो मात्र अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने मिळाला आहे. भले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असोत. त्यांची तोंडाची भाषा भ्रष्टाचार विरोधाचीच राहिली. त्यामुळे मोदी सरकारवर निशाणा साधण्यासाठी त्यांना केजरीवाल नावाचे “नवे जेपी” हत्यार मिळाले.
केजरीवालांना दिलासा नाही; 3 एप्रिलला हायकोर्टात सुनावणी; नंतर ताब्यात घेण्याची सीबीआयची तयारी!!
वास्तविक काँग्रेसला बिलकुलच त्यांच्या मागे जायचे नव्हते. कारण केजरीवालांच्या मागे गेले, तर आपले राजकीय महत्त्व कमी होईल, हे राहुल गांधींना, विशेषतः सोनिया गांधींना निश्चित समजत होते. पण ज्या प्रकारे INDI आघाडीतले बाकीचे घटक पक्ष केजरीवाल यांच्या भोवती एकवटले, ते पाहून काँग्रेस एकटी पडेल ही भीती सोनिया आणि राहुल गांधींना वाटली आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेसची केजरीवालांमागे स्वतःहून फरफट होऊ दिली. अन्यथा राहुल गांधींनी तब्बल 6200 किलोमीटर भारत चालून जी वातावरण निर्मिती केली होती, त्या वातावरण निर्मितीचे मूसळ त्यांनी स्वतःहून केरात घालण्याचे कारण नव्हते. पण ते घालावे लागले.
राहुल गांधींना जे 6200 किलोमीटर भारत चालून जमले नव्हते, ते केजरीवालांनी दिल्लीत 5 – 7 किलोमीटरचे अंतर ईडीच्या गाडीतून कापून साध्य करून दाखविले. सगळे विरोधक आपल्या भोवती एकवटून दाखविले आणि ते स्वतः INDI आघाडीचे “नवे जेपी” बनले. आता त्यांच्या मागे काँग्रेसची फरफट होणे अपरिहार्य आहे. म्हणूनच INDI आघाडीतले सगळे घटक पक्षांचे नेते दिल्लीत एकवटून रामलीला मैदानात केजरीवालांभोवती फेर धरून नाचत आहे आणि केजरीवालांची गजाआडची पोस्टर्स दिल्लीभर लागून त्यात केजरीवाल तुरुंगात नव्हे, तर एखाद्या गजाच्या खिडकीत उभे आहेत असे दिसत आहेत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App