दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचा दारूण पराभव झाला. या पराभवासाठी Indi आघाडीतल्या बेबनावाची वेगवेगळी कारणे सांगितली जात असली आणि पंतप्रधान मोदींनी देखील काँग्रेसचा हात ज्याच्यावर पडला, त्याचा बेडा गर्ग झाला, असा आरोप केला असला तरी केजरीवालांची प्रतिमा निर्मिती ते प्रतिमा भंजन हेच आम आदमी पार्टीच्या पराभवाचे खरे कारण ठरले.
आपण पठाडीबाज किंवा प्रोफेशनल राजकारणी नाही. आपण सर्वसामान्य माणसांमधून सर्वसामान्य माणसांसाठी आलेले नेतृत्व आहोत, अशी प्रतिमा निर्मिती अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने केली होती. त्यावेळी त्यांना दिल्लीच्या पठाडीबाज राजकारणात नसलेल्या अनेक तरुणांनी साथ दिली होती. जे तरुण आपापल्या व्यवसायांमध्ये कुशलता आणि यश मिळवलेले होते. ते सगळे केजरीवाल यांच्या भोवती जमा झाले होते. त्यामध्ये प्रशांत भूषण, कुमार विश्वास यांच्यासारख्यांचाही समावेश होता. अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनामुळे जसा संपूर्ण देशपातळीवर भाजपला फायदा झाला होता, तसा तो दिल्लीच्या प्रादेशिक पातळीवर अरविंद केजरीवालांची प्रतिमा निर्मिती करण्यात झाला होता. “अण्णा शिष्य” म्हणून ते पुढे आले होते. महात्मा गांधींचे शिष्य विनोबा भावे, तसे अण्णांचे शिष्य अरविंद केजरीवाल अशी त्यांची प्रतिमा बनली होती.
आपण समाज परिवर्तनासाठी राजकारणात आलो, असे सांगत केजरीवाल यांनी सुरुवातीच्या काळात राजकीय नेत्यांना असलेली सुरक्षा नाकारली. आलिशान गाड्या नाकारल्या. ते सर्वसामान्यांच्या “वॅगन आर” या मोटारीतून फिरले. “आम्ही अण्णा” म्हणून टोपी घातली. त्यामुळेच केजरीवाल दिल्लीतल्या सामान्य जनतेला “आपले” वाटले. ती त्यावेळी रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या विषयावर बोलायचे. ते लोकांना भावले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी भाजप पारड्यात मते टाकली, तरी विधानसभा निवडणुकीत त्यांनी केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांना एकदा नव्हे, तर दोन विधानसभा निवडणुकांमध्ये कौल दिला.
पण तिसऱ्या वेळेला दिल्लीच्या जनतेने केजरीवाल यांना कौल नाकारला. कारण केजरीवाल यांचे तोपर्यंत पुरते प्रतिमा भंजन झाले होते. ते काँग्रेस किंवा भाजपच्या नेत्यांनी करण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्याच राजकीय कर्तृत्वाने ते केले. केजरीवाल यांच्या आधीच्या अनेक विश्वासू सहकाऱ्यांनी केजरीवाल यांच्यात झालेले “बदल” टिपले होते. ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. केजरीवाल हळूहळू पठडीबाज राजकारणी बनले. त्यांनी काँग्रेसी संस्कृतीतला भ्रष्टाचार आत्मसात केला. स्वतःसाठी शीश महाल बांधला. वेगवेगळ्या सरकारी धोरणांमधून पैसा उभा केला. दारू घोटाळ्यातला पैसा गोवा निवडणुकीत वापरला. मोहल्ला क्लिनिक शाळा सुधारणा वगैरे बाबी त्यांनी स्वतःहून मागे सोडून दिल्या. त्या ऐवजी दारू धोरण आणून “पैशाचे नेटवर्क” उभे केले. इतकेच नाही, तर दिल्ली दंगली दरम्यान न्याय्य वर्तणूक ठेवण्यापेक्षा काँग्रेसी पठडीतली तथाकथित धर्मनिरपेक्षता जपली. थोडक्यात ते मुस्लिम धार्जीणे बनले. आपल्याच महिला सहकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची आणि त्यांच्या पीएची मजल गेली. हे सगळे गेल्या पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने घडत गेले. तिथे सुरुवातीला केजरीवालांचे प्रतिमा भंजन झाले आणि नंतर त्यांची प्रतिमा पूर्ण ढासळून गेली. याचा फटका आम आदमी पार्टीला निवडणुकीत बसला.
काँग्रेस सारख्या दुबळ्या पक्षाने केवळ मते कापून केजरीवालांचा पराभव केल, असे म्हणणे हा मानभावीपणा असेल, कारण ते अर्धसत्य आहे. केजरीवालांचा पराभव त्यांच्या अहंकाराने आणि त्यांच्या चुकीच्या धोरणाने केला. काँग्रेस त्यासाठी काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये निमित्त मात्र झाली, पण त्या पलीकडे जाऊन केजरीवालांनी निर्मिती केलेली स्वतःचीच प्रतिमा स्वतःच्या राजकीय कर्तृत्वाने उद्ध्वस्त केली. हेच अण्णा हजारे यांच्यासारख्या केजरीवालांना घडविलेल्या ज्येष्ठ आंदोलक नेत्याने अधोरेखित करून सांगितले ते पूर्ण सत्य ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App