वृत्तसंस्था
मुंबई : अदानी समूहाने ( Adani Group ) महाराष्ट्राला 6600 मेगावॅट रिन्यूएबल एनर्जी आणि औष्णिक उर्जेचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी बोली जिंकली आहे. कंपनीने यासाठी 4.08 रुपये प्रति युनिट बोली लावली आणि JSW एनर्जी आणि टोरेंट पॉवरला मागे टाकले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 25 वर्षांसाठी अक्षय आणि औष्णिक ऊर्जा पुरवण्यासाठी अदानी समूहाची बोली ही महाराष्ट्र सध्या ज्या दराने वीज खरेदी करत आहे त्यापेक्षा एक रुपया कमी आहे. यामुळे राज्याच्या भविष्यातील वीजेच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.
48 महिन्यांत वीजपुरवठा सुरू होणार
लेटर ऑफ इंटेंट (LoI) जारी केल्याच्या तारखेपासून 48 महिन्यांत वीज पुरवठा सुरू होणार आहे. बोलीच्या अटींनुसार, अदानी पॉवर संपूर्ण पुरवठा कालावधीत 2.70 रुपये प्रति युनिट दराने सौर ऊर्जा पुरवेल. तर कोळशापासून निर्माण होणाऱ्या विजेची किंमत कोळशाच्या किमतीच्या आधारे निश्चित (इंडेक्स्ड) केली जाईल.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने मार्चमध्ये सूर्यप्रकाशापासून निर्माण होणारी 5000 MW आणि कोळशापासून निर्माण होणारी 1600 MW वीज खरेदी करण्यासाठी एक अनोखी निविदा काढली होती.
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते जारी करण्यात आले होते आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अदानी समूहाला देण्यात आले होते. या निविदेमध्ये पीक अवर्समध्ये विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा या दोन्हींचा पुरवठा समाविष्ट आहे.
अदानी पॉवरने प्रति युनिट 4.08 रुपये बोली लावली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरने करार जिंकण्यासाठी प्रति युनिट 4.08 रुपये बोली लावली. दुसरी सर्वात कमी बोली JSW एनर्जीची होती 4.36 रुपये प्रति युनिट. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्रातील सरासरी 4.70 रुपये प्रति युनिट वीज खरेदी किमतीच्या तुलनेत हे कमी आहे.
2024-25 साठी वीज खरेदीची सरासरी किंमत रु 4.97 प्रति युनिट
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) 2024-25 साठी सरासरी वीज खरेदी किंमत रुपये 4.97 प्रति युनिट निश्चित केली आहे. अशा प्रकारे, अदानीने लावलेली बोली यापेक्षा सुमारे एक रुपया प्रति युनिट कमी आहे. 25 वर्षे वीजपुरवठ्याच्या निविदेत एकूण चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी औष्णिक वीज उत्पादक अदानी पॉवरची उत्पादन क्षमता 17 GW पेक्षा जास्त आहे, जी 2030 पर्यंत 31 GW पर्यंत वाढेल. तिची उपकंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही 11 GW उत्पादन क्षमता असलेली देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे. 2030 पर्यंत ते 50 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more