विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई 26/11 हल्ल्याचा कट रचणारा आणि जमात-उद-दावा (JuD) या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की (वय 70) याचे 27 डिसेंबर रोजी लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उच्च मधुमेहाच्या उपचारासाठी तो लाहोरमधील खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून दाखल होता.
मक्की हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा (LeT) चा प्रमुख नेता होता. 26/11 मुंबई हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता. मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. मक्कीने LeT साठी निधी उभारणी केली आणि अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांसाठी आर्थिक पाठबळ दिले. त्याच्यावर अमेरिकेने $2 मिलियनचे इनाम जाहीर केले होते.
काश्मीरमध्ये “रक्ताच्या नद्या” वाहण्याची धमकी मक्कीने अनेक वेळा भारताला दिली होती. त्याच्या या भडक वक्तव्यांमुळे तो जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झाला.
संयुक्त राष्ट्रांनी 16 जानेवारी 2023 रोजी मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. त्याच्यावर आर्थिक निर्बंध, प्रवासबंदी आणि शस्त्रास्त्र प्रतिबंध लागू करण्यात आले. याआधी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने 2010 मध्येच मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.
मक्कीच्या नेतृत्वाखाली लष्कर-ए-तय्यबाने भारतात अनेक हल्ले घडवले. 2000 मध्ये लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले. 2008 च्या रामपूर CRPF कॅम्पवरील हल्ल्यात आठ जण ठार झाले. 2018 मध्ये शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणातही LeT चा हात होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App