नाशिक : महाराष्ट्र विधानसभेतला काँग्रेसचा विरोधी पक्षनेता पुढच्या आठवड्यात ठरेल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांना भेटून आल्यावर केले आहे. पण त्यामुळेच काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होईल किंवा नाही, यावर संशय दाटला आहे.Will Congress be able to select its opposition leader depending on sharad pawar??
काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी 25 – 26 ऑगस्टला होणाऱ्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीच्या पूर्वतयारीची चर्चा झाली, तसेच काँग्रेसच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत ही चर्चा झाली. याविषयीची माहिती नानांनी दिली.
सध्या विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. परंतु विधानसभेला विरोधी पक्षनेता नाही. कारण अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांचे संख्याबळ विभागले आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतापद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अर्थात ही आशा प्रत्यक्षात येऊ शकेल की नाही??, याविषयी मात्र दाट संशय आहे आणि या संशयाला महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातल्या शरद पवारांच्या राजकीय वर्तणुकीचा आधार आहे.
ही राजकीय कहाणी अशी :
महाविकास आघाडी सत्तेवर आली, तेव्हा नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष होते. मात्र काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीत ठरलेल्या सत्तावाटपा नुसार हे पद काँग्रेसच्या दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे जायला हवे होते. परंतु सुमारे दीड वर्षे विधानसभेचे अध्यक्ष पद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी काँग्रेसला मिळू दिले नव्हते. उलट नाना पटोले यांनी आपल्याला विश्वासात न घेता राजीनामा दिला, असा आरोप त्यावेळी ठाकरे आणि पवारांनी केला होता.
त्यानंतर ठाकरे – पवार सरकार गेले. शिंदे – फडणवीस सरकार आले. पण तरी देखील काँग्रेसला महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपातले हक्काचे विधानसभेचे अध्यक्ष पद शरद पवारांच्या राजकीय खेळीमुळे मिळू शकले नव्हते, ही वस्तुस्थिती बदलत नाही.
संग्राम थोपटेंना विरोध
त्यावेळी काँग्रेसने पवारांचे पुणे जिल्ह्यातले कट्टर विरोधक अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभा अध्यक्ष पदासाठी पुढे केले होते. संग्राम थोपटे एक दोनदा त्यासाठी शरद पवारांना भेटूनही आले होते. पण शरद पवारांनी अखेरपर्यंत राजकीय खेळी करून काँग्रेसच्या हक्काचे विधानसभा अध्यक्षपद पक्षाला मिळू दिले नव्हते.
राष्ट्रवादीतल्या फुटीविषयी दाट संशय
या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पातळीवर विधानसभेत फूट पडल्याचे शरदनिष्ठ गट आणि अजितनिष्ठ गट बिलकुल दाखवत नाहीयेत. कोणत्या गटाकडे नेमके किती आमदार ही संख्या आजही ते गुलदस्त्यातच ठेवत आहेत. राष्ट्रवादीतल्या या सत्ता संघर्षात शरद पवारांची एकूणच राजकीय भूमिका दाट संशयाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खरंच फुटली आहे किंवा नाही, याविषयी कायदेशीर पातळीवर दोन्ही गट उघडपणे कोणतीच हालचाल करत नाहीत. त्यामुळे वरवर जरी विधानसभेत संख्याबळानुसार काँग्रेस मोठा विरोधी पक्ष वाटत असली, तरी त्यांच्या हक्काचे विरोधी पक्षनेते पद शरद पवार काँग्रेसला मिळूच देतील, याविषयी बिलकुलच खात्री देता येत नाही.
नाना पटोले यांनी शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर पुढच्या आठवड्यात काँग्रेसचा विरोधी पक्षनेता विधानसभेत दिसेल, असे वक्तव्य केले आहे. पण हे वक्तव्य त्यांनी उघडपणे केल्यानेच शरद पवार ते घडू देतील का??, हा कळीचा सवाल तयार झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App