संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज;मराठा आरक्षणासाठी दिल्लीत लॉबिंग हवे; शाहू महाराजांचे प्रतिपादन

प्रतिनिधी

कोल्हापूर – मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या आमदार, खासदारांनी एकत्र येऊन दिल्लीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकट्यावरच जबाबदारी टाकणे आणि त्यांनी सर्व करणे अशक्य आहे. त्यामुळे सर्व आमदार – खासदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळाने दिल्लीत विषय पोहोचवला पाहिजे, असे प्रतिपादन शाहू महाराजांनी आज मराठा मूक आंदोलनात केले. कोल्हापूरमधील सर्वपक्षीय नेते आमदार – खासदार यामध्ये सहभागी झाले होते. Shahu maharaj pitches for sambhaji raje for next lok sabha election

शाहू महाराज म्हणाले, की मराठा आरक्षणाचा विषय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडून चालणार नाही. पंतप्रधान म्हणतील मी काय करू, बाकीच्यांचे मत काय माहिती नाही, असे चालणार नाही. बहुमतासाठी दिल्लीत लॉबिंग करावे लागेल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांसमोर हा विषय मांडला आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले असले तरी अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे समजलेले नाही. ते स्पष्ट झाले तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. त्यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांच्याकडे जाऊन सोबत येण्यासाठी विनंती केली पाहिजे, असा सल्ला शाहू महाराजांनी यावेळी दिला.आपला आवाज मुंबईपर्यंत जाईलच, पण दिल्लीपर्यंतही कसा नेता येईल हे पाहावे, असे आवाहन शाहू महाराजांनी केले. ते म्हणाले, की अजित पवार यांनी भेटीदरम्यान मांडण्यात आलेले मुद्दे रास्त असून योग्य विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. राज्य सरकार आपल्यासोबत असणार आहे यात मला शंका वाटत नाही. पण तरीही सगळेच मिळेल अशी अपेक्षा करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. जे शक्य आहे आणि योग्य आहे ते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मिळणे हा मुख्य प्रश्न आहे, याकडे शाहू महाराजांनी लक्ष वेधले.

कायद्यामध्ये अनेकदा बदल झाले आहेत. त्यामध्ये आणखी एक बदल करण्यास काय अडचण आहे? मनात आणले तर सगळे होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

Shahu maharaj pitches for sambhaji raje for next lok sabha election