मराठी साहित्य विश्वातले विनोदी शैलीमध्ये लिहिणारे लेखक आणि कथाकथनकार ही त्यांची ओळख होती.Senior Literary D. M. Mirasdar passed away at the age of 94 years
विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्य विश्वातले विनोदी शैलीमध्ये लिहिणारे लेखक आणि कथाकथनकार ही त्यांची ओळख होती.
द. मा. मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल, 1927 मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. 1952 साली अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती.द. मा. मिरासदार यांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या.
गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.
द.मा.मिरासदार यांच्या ‘भुताचा जन्म’ या कथेवर बनलेली शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली. द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक.
मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार द. मा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App