संजय राऊतांच्या अटकेचे शिवसेनेकडून राजकीय भांडवल; पण भाजपचे वरिष्ठ नेते “शांत” का??… समजून घ्या राजकारण!!

विनायक ढेरे

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसैनिक महाराष्ट्रभर आंदोलनाचा धडाका उडवून राऊतांच्या अटकेचे राजकीय भांडवलीकरण करण्याचा प्रयत्न चालवला असताना तसेच संजय राऊत यांच्या अटकेवर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांभधून एकमेकांविरोधात आक्रमक प्रतिक्रिया येत असताना भाजपचे महाराष्ट्रातले अतिवरिष्ठ नेते आणि केंद्रातले भाजपचे नेते “तुलनेने” शांत का बसले आहेत??, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण भाजपच्या राजकीय वर्तणुकीतून याचे उत्तर मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कधीच ईडी, एनआयए अथवा सीबीआयच्या कारवायांवर प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. (जे प्रत्यक्ष “कृती” करतात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करायचे कारणच काय??, अशी या मागची भावना आहे!!) Sanjay Raut’s arrest political capital from Shiv Sena

– राऊतांभोवतीचे राजकारण संपुष्टात

मूळात भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे, की ज्या शिवसेनेने गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरवत ठेवले त्यांच्यासारख्या बडबोल्या प्रवक्त्यांना फारसे महत्त्व द्यायचेच नाही… आणि ही गेल्या काही दिवसांमध्ये स्ट्रॅटेजी नसून ही साधारण महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांत बनलेली म्हणजे गेल्या सुमारे दोन वर्षांची स्ट्रॅटेजी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून अधून मधून यास स्ट्रॅटेजीचे सूतोवाच होत असते, ते म्हणजे संजय राऊत रोज काहीतरी बडबडतात. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारू नका. काहीतरी वेगळे आणि ठोस प्रश्न विचार असे ते नेहमी म्हणत असतात. राणे पितापुत्र, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार वगळता भाजपचे वरिष्ठ नेते क्वचितच संजय राऊत यांच्या वक्तव्यावर अथवा राजकीय कृतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. ही स्ट्रॅटेजिक क्रोनोलॉजी नीट समजून घेतली पाहिजे!!

– शिवसेनेचा डाव, भाजपचा प्रतिडाव

संजय राऊत यांच्या अटकेभोवती राजकारण फिरवायचे हा शिवसेनेचा प्लॅन असला आणि मराठी माध्यमांमधून त्याला प्रोत्साहन मिळत असले तरी भाजप या प्लॅनला धूप घालणार नाही हेच यातून स्पष्ट होते. उद्धव ठाकरे फॅक्टर आणि संजय राऊत नावाचा उप फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परिक्षेत्रातून पूर्णपणे वगळण्याचाच ही महत्त्वाची राजकीय स्ट्रॅटेजी आहे!!

– पत्राचाळीतील रहिवाशांचा आवाज

मराठी माध्यमांमधून शिवसेनेच्या दोन्ही गटांमधून आणि भाजपच्या काही विशिष्ट नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया वगळता भाजपने पत्राचाळीतील 650 रहिवाशांना अद्याप घरे मिळाली नाहीत. हा मराठी माणसावर शिवसेनेने केलेला अन्याय आहे, या मुद्याभोवती राजकारण फिरवायचे ठरवलेले दिसते. भाजप नेत्यांच्या कालच्या आणि आजच्या प्रतिक्रियांमधून याचे प्रतिबिंब पडले आहे. याचा अर्थ उघड आहे, संजय राऊत यांची अटक शिवसेना जरी “ग्लॅमराईज” करत असली तरी ते “ग्लॅमर” त्यांना प्राप्त होऊ द्यायचे नाही. उलट त्यांनी मराठी माणसात विरोधात केलेले गुन्हे उजागर करायचे हे ते प्लॅनिंग आहे आणि इथेच भाजपच्या राजकारणाचे वेगळे वैशिष्ट्य दिसते आहे.

– पवारांचाही प्रतिसाद तुलनेने “थंडा”!!

राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील संजय राऊत यांच्या अटकेबद्दल एवढी आदळपट केलेली दिसली नाही. स्वतः शरद पवार आणि एखाद दुसरी नेत्याची प्रतिक्रिया वगळता राष्ट्रवादीने देखील संजय राऊत यांच्या अटकेला राजकीय दृष्टीने “थंडा” प्रतिसाद दिलेला दिसतो आहे. याचा अर्थच असा की संजय राऊत यांच्या भोवतीचे राजकारण आता लयाला चालले आहे… उरली आहे ती कायदेशीर लढाई आणि शिवसेनेचे राऊतांच्या अटकेचे राजकीय भांडवलीकरण!!… आणि ही कायदेशीर लढाई किती किचकट असते हे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या उदाहरणावरून दिसतेच आहे. तसेही पवार आपल्या निकटच्या सहकाऱ्यांना कायदेशीर लढाईत कितपत मदत करतात??, हेही देशमुख, मालिकांच्या उदाहरणावरून महाराष्ट्र समोर आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या कायदेशीर लढाईत त्यांना पवारांची साथ कितपत मिळेल??, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही!!

Sanjay Raut’s arrest political capital from Shiv Sena

महत्वाच्या बातम्या