शिवसेनेच्या मंत्र्यांना घेरायला गेले अन् राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांसकट काका – पुतणेच चौकशीच्या लपेट्यात आले!!; दर महिन्याला १०० कोटींची वसूली…??


विनायक ढेरे

मुंबई – सचिन वाझे लेटरबाँम्ब प्रकरणाची कायदेशीर लढाई बरीच लांबवर जाणार असतानाच हे महाविकास आघाडीचे सरकार बनविताना शरद पवारांनी जो मनसूबा ठेवला होता की… शिवसेनेला अंगठ्याखाली धरून सरकारवर आपला कायमचा वचक ठेवायचा, तोच नेमका ढासळून पडताना दिसतोय. sachin vaze letterbomb; NCP leadership sharad pawar and ajit pawar more under scanner than shiv sena

शिवसेनेच्या मंत्र्यांना घेरायला जातानाच स्वतः शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही चौकशीच्या लपेट्यात कसे आले, ते त्यांना समजलेले दिसत नाही… किंवा अहमदाबादची “रात्रीची भेट” वाया गेलेली दिसतेय. कारण सचिन वाझेंनी लिहिलेल्या पत्रात शिवसेनेचे मंत्री अनिल परबांचे नाव घेतले हे खरे आहे… पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे २ कोटींच्या लाचखोरी प्रकरणाच दस्तुरखुद्द शरद पवारांचे नाव घेतले आहे. आणि दरमहा १०० कोटींच्या वसूली प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव घेतले आहे… आणि हे पत्र कोर्टाने स्वीकारण्यापूर्वी मीडियाच्या हातात आले आहे.

सचिन वाझेंनी लिहिलेल्या पत्रातले तपशील बारकाईने वाचले, तर मामला फक्त १०० कोटी रूपयांच्या वसूलीचा राहातच नाही. तो त्या पेक्षा कितीतरी पट जास्त रकमेच्या वसूलीचा होऊन जातो. आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच अधिक खोलवर अडकताना दिसते… म्हणजे… शिवसेनेचे परिवहन मंत्री मुंबई महापालिकेच्या ५० कंत्राटदारांची नावे देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी २ कोटी म्हणजे १०० कोटी वसूल करायला सांगितले होते, असे वाझेंनी पत्रात नमूद केले आहे. अर्थात ही वसूली वन टाइम म्हणजे एकदाच करायची होती.

पण पत्रातले दर्शन घोडावत – अजित पवार यांच्यासंबंधीचे उल्लेख वाचले, तर त्यामध्ये दरमहा म्हणजे दर महिन्याला १०० कोटींची वसूली गुटखा उत्पादक, वितरक आणि व्यापारी यांच्याकडून करायला सचिन वाझेंना सांगण्यात आले होते. असा स्पष्ट उल्लेख सचिन वाझेंनी पत्रात केला आहे… याचा अर्थ ही रक्कम १०० कोटी रूपयांच्या कितीतरी पट जास्त होते. याचा अर्थ, अजित पवारांशी संबंधित वसूलीची रक्कम शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगितलेल्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे वाझेंच्या पत्रातल्या तपशीलातूनच स्पष्ट होते… इथेच खरी कायदेशीर आणि राजकीय मेख आहे.

सचिन वाझेंच्या पत्राची ऑथेंटिसिटी, त्यातले तपशील वगैरेची सत्यता हे एनआयए तपास संस्थेच्या आखत्यारित येतात. त्यांचा तपास करणे हे एनआयएचे काम आहे. आणि त्यावेळी चौकशी करताना दर्शन घोडावत आणि अजित पवार यांनाही एनआयए बोलावू शकते. त्यातच दर्शन घोडावत नामक व्यक्तीच्या कंपनीत पार्थ पवार हे संचालक असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे संशय अधिक गहिरा होतो.

खुद्द शरद पवार संशयाच्या घेऱ्यात

त्याचवेळी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासंबंधीच्या २ कोटी रूपयांच्या देवाण – घेवाणीत थेट शरद पवारांचे नाव सचिन वाझेंनी घेतले आहे. सचिन वाझेंच्या म्हणण्यानुसार शरद पवारांचा सचिन वाझेंना सेवेत घेण्यास विरोध होता. पण त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पवारांचे मन वळविण्यासाठी सचिन वाझेंकडे २ कोटी रूपये मागितले. अर्थात ते त्यांनी त्यावेळी दिले नाहीत. पण देशमुखांनी त्यांना पैसे देण्यासाठी मुदतही दिली.



सचिन वाझेंना जून २०२० मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. याचा अर्थ पवारांचा त्यांना सेवेत घेण्याला विरोध मावळला होता का… तो केव्हा, कसा आणि कशाच्या बदल्यात मावळला… या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडून एनआयएला घ्यावी लागतील.

संजय राठोड राजीनाम्याच्या वेळी शरद पवारांनी ठेवलेले “सूचक मौन” आज महागात पडतेय का…??

अर्थात याला एक वेगळी राजकीय बाजू देखील आहे. शिवसेना – राष्ट्रवादीतला हा सुप्त संघर्ष आहे. पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात संजय राठोडांचा राजीनामा घेण्याच्या वेळी शरद पवारांनी “सूचक मौन” बाळगले होते. पण अनिल देशमुखांचा त्यांनी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न केला. अगदी हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआय चौकशी दारात आली त्यावेळी नाईलाजास्तव अनिल देशमुखांचा राजीनामा त्यांना स्वीकारावा लागला.

शिवसेना नेतृत्वाने त्यावेळी “आमचा संजय तर तुमचा अनिल” म्हणून राष्ट्रवादीचे प्यादे मारू दिले… पण आता दोन्ही नेतृत्वाच्या खऱ्या कसोटीची वेळ आहे. सचिन वाझेंनी पत्रात अनिल परबांचे नाव घेतले आहे. पण त्यांनी राजीनामा द्यायला ठाम नकार दिला आहे. पण त्याचवेळी वाझेंनी दस्तुरखुद्द शरद पवार आणि अजित पवार यांची नावेही पत्रात लिहून राष्ट्रवादीची पुरती गोची करून टाकली आहे.

आता अनिल परबांचा राजीनामा घ्यायचा… तर अजित पवारांचे नाव तर त्यांच्यापेक्षा किती तरी पट जास्त रकमेच्या वसूलीसाठी वाझेंनी लिहिले आहे. त्यामुळे अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा लागेल… आणि इथेच शिवसेनेला अंगठ्याखाली ठेवून सरकारवर वचक ठेवण्याच्या शरद पवारांच्या मनसूब्याला सुरूंग लागलेला दिसतोय…!! कारण वसूली प्रकरणात शिवसेनेच्या बदनामीपेक्षा कितीतरी जास्त बदनामी राष्ट्रवादीला सहन करावी लागेल. कारण मामला गुटखा उत्पादक – वितरक आणि विक्रेत्यांकडून वसूलीचा आहे. आणि गुटखा किंगांशी पवारांचे नाते सर्वश्रूत आहे…!!

sachin vaze letterbomb; NCP leadership sharad pawar and ajit pawar more under scanner than shiv sena

इतर बातम्या वाचा…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात