Saamana Editorial : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ने लसीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारला हल्लाबोल केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखात आरोप करण्यात आलाय की, जेव्हा जेव्हा महाराष्ट्र सरकारने कोरोना लस केंद्राकडे मागितली, तेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ‘वसुलीबाज’सारखे शब्द वापरले. यात असा आरोप करण्यात आलाय की, भाजप शासित राज्यांमध्ये या लसीचा पुरवठा केला जात आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र लसीची आणीबाणी सुरू झाली आहे. Saamana Editorial Criticizing Modi Govt For Vaccine Shortage
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ने लसीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारला हल्लाबोल केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखात आरोप करण्यात आलाय की, जेव्हा जेव्हा महाराष्ट्र सरकारने कोरोना लस केंद्राकडे मागितली, तेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ‘वसुलीबाज’सारखे शब्द वापरले. यात असा आरोप करण्यात आलाय की, भाजप शासित राज्यांमध्ये या लसीचा पुरवठा केला जात आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र लसीची आणीबाणी सुरू झाली आहे.
सामनात असेही म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथे लसीचा अभाव आहे आणि पंतप्रधान मोदींनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान जारी केले आहे. आपल्यात राजकीय भांडण आहे, पण त्या भांडणांसाठी आपल्या लोकांचा बळी का दिला जात आहे? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात असेही लिहिण्यात आले आहे की, सध्याचे जे दिल्लीश्वर आहेत त्यांची मोगलाई ही औरंगजेबाच्याही वरताण आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कोरोना या विषाणूने हाहाकार माजवला आहेच, पण त्यामागचे राजकारण हे जणू तांडवच करू लागले आहे. माणसे सरणावर चढत आहेत व त्यांच्या मढय़ांवरून वादावादी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे असे कधीच घडले नव्हते. कोरोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर बरेच वाद झाले, पण सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे. ‘जे ‘गांडू’ आहेत त्यांना कोरोना होणारच. कोरोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत,’ असा विचार सांगलीच्या या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणाऱया कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील. महाराष्ट्रात व देशात कोरोना अनेक भल्याभल्यांना झाला. म्हणजे जे मेले ते मरायच्याच लायकीचे व ज्यांना कोरोना झाला ते ‘गांडू’! भिडे गुरुजीही संघ विचाराचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. ‘मास्क’ वगैरे लावू नका, असे विचारही त्यांनी मांडले.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवराय भक्तीचे वारे वाहत असते. त्यामुळे हे राज्य मर्दांचेच आहे हे काय भिडे किंवा भाजप पुढाऱयांना माहीत नाही? महाराष्ट्राशी आमनेसामने लढण्याची हिंमत नाही, तेव्हा हे असे छळवाद सुरू करायचे. केंद्र सरकार महाराष्ट्राला लसपुरवठा करण्याबाबत जो अडेलतट्टूपणा करीत आहे तो ‘शिव’काळात झाला असता तर छत्रपती शिवाजीराजे काय किंवा छत्रपती संभाजीराजे काय, महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून पुन्हा रायगडावर परतले असते. ‘लसी’च्या बाबतीत सध्याचे दिल्लीश्वर जी मोगलाई चालवत आहेत ती औरंगजेबाच्याही वरताण आहे. पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील पुढारी पक्षीय मतभेद विसरून संकटकाळी महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी एकत्र येऊन आकाशपाताळ एक करीत. आज चित्र पूर्णच पालटून गेले. पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे. कोरोना संकटाची लढाई पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. देशात कोविड लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत मोदीच घेत होते हे जावडेकर विसरलेले दिसतात. पंतप्रधानांनी कोविडसंदर्भात जे जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे. अर्थात, जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरलेला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी तर महाराष्ट्राची ‘लसी’च्या बाबतीत न्याय्य मागणी लाथाडण्याचाच प्रयत्न केला व आरोग्यविषयक गंभीर स्थितीत ‘वसुलीबाज’ वगैरे शब्द वापरून राजकारण किती ‘गांडू’ पद्धतीने सुरू आहे ते दाखवून दिले. महाराष्ट्रात लसीची आणीबाणी सुरू झाली आहे ती केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाने. भाजपशासित राज्यांना जास्तीत जास्त लस साठा पुरवला गेला आहे. उत्तर प्रदेशला 44 लाख डोस, मध्य प्रदेशला 33 लाख डोस, गुजरातला 16 लाख, कर्नाटक 23 लाख, हरयाणा 24 लाख, झारखंड 20 लाख आणि महाराष्ट्राच्या वाटय़ाला रडतखडत कसेबसे 17 लाख डोस आले. महाराष्ट्राची लोकसंख्या व कोरोना संक्रमणाची तीव्रता सगळय़ात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App