‘हा देश हिंदूंचा हा विचार राहुल गांधींनी घासूनपुसून पुन्हा वर आणला’, शिवसेनेच्या सामनातून काँग्रेसला कानपिचक्या


महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची अवस्था आता रया गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, या शरद पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख करत काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रातील मुस्लिम शिवसेनेला बिनधास्तपणे मतदान करतात, असा दावाही करण्यात आला आहे. Saamana Editorial Criticizing Congress Rahul Gandhi On Hindu And Hindutwa


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची अवस्था आता रया गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, या शरद पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख करत काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रातील मुस्लिम शिवसेनेला बिनधास्तपणे मतदान करतात, असा दावाही करण्यात आला आहे.

हिंदू – हिंदुत्व असा राहुल गांधींनी केला शब्दच्छल

संपादकीयात लिहिले आहे की, ” राहुल गांधी यांनी महागाईचे खापर हिंदुत्वावर फोडले. गांधी म्हणतात, ‘‘हा हिंदूंचा देश आहे. हिंदुत्ववाद्यांचा नाही आणि आज या देशात महागाई असेल तर हे काम हिंदुत्ववाद्यांनी केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नाही. सन 2014 पासून देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, हिंदूंचे नाही. आणि आपल्याला हिंदुत्ववाद्यांना घालवायचे आहे आणि पुन्हा हिंदू राजवट आणायची आहे,’’ असा महनीय विचार श्री. गांधी यांनी मांडला आहे. हिंदू आणि हिंदुत्व याबाबत त्यांनी शब्दच्छल केला आहे. तरीही देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाला साद घालण्याची भूमिका अनेक वर्षांनंतर काँग्रेसने घेतली. निधर्मीवाद म्हणजे फालतू सेक्युलरवादाच्या फंदात व छंदात अडकून पडलेल्या काँग्रेसला राहुल गांधींनी नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची आजची अवस्था गावातल्या जमीनदारी गेलेल्या पडक्या भग्न वाडय़ासारखी झाली असल्याचे विश्लेषण शरद पवारांसारख्या नेत्यांनी केले, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. मुस्लिम व दलित मतांची घसघशीत रोकडा पेढी हेच त्या जमीनदारीचे फळ होते. याच मुसलमान – दलितांच्या ‘रोकडा’मुळे काँग्रेसचा वाडा चिरेबंदी तसेच वैभवशाली वाटत होता. आज ही दोन्ही खणखणीत नाणी काँग्रेसच्या मुठीतून सुटली व उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, प. बंगालसारख्या मोठय़ा राज्यांतून काँग्रेसची घसरण झाली. मुंबई-महाराष्ट्रातला मुसलमान बिनधास्तपणे शिवसेनेला मतदान करतो. मुस्लिमांचे मतांसाठी फालतू लांगूलचालन न करणाऱ्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने आपले मानावे हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे.”मोदी सरकारने धाडसी निर्णय घेतला

सामनात पुढे लिहिले आहे की, रामापेक्षा बाबरभक्तीत राज्यकर्ते लीन झाल्यावर लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला व काँग्रेस त्यात होरपळून निघाली. हे सत्य नाकारता येत नाही. शाहबानो प्रकरणात काँग्रेसने पीडित मुसलमान महिलेचा हक्क डावलला व शरियतमध्ये न्यायालयाने ढवळाढवळ केली हे मान्य करून घटनादुरुस्ती केली. हे काही लोकांना पटले नाही, पण मोदी सरकारने बिनधास्तपणे तीन तलाक विरोधी कायदा करून पीडित मुसलमान महिलांना दिलासा दिला. असे धाडसी निर्णय घेताना हिंदू किंवा मुसलमान पाहायचे नसते. धर्माच्या वर देश आहे. सक्तीचे कुटुंब नियोजन, समान नागरी कायदा हे आता राष्ट्रहिताचे व राष्ट्रवादाचेच विषय बनले आहेत. त्यावर भूमिका घ्यावीच लागेल. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीचे रक्षक होते. त्यांनी जागोजाग मंदिरांचीच उभारणी केली. त्यात त्यांना धार्मिक अध्यात्मवाद दिसला. ”

देशात हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले!

त्यात पुढे लिहिलेय की, देशातील हिंदूंना डावलून कोणताही लढा निर्माण करता येणार नाही व पुढे नेता येणार नाही हे काँग्रेसच्या पूर्वजांनी जाणले होते. पण स्वातंत्र्यानंतर फालतू निधर्मीवादाचा जन्म झाला व हिंदूंना आपल्याच देशात असहाय्य वाटू लागले. हिंदू समाजाच्या मनात काँग्रेसविषयी एक अढी निर्माण झाली. काँग्रेसला फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांचेच पडले आहे. अल्पसंख्याकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा समज लोकांत आजही घट्ट रुजला आहे. तो दूर करावा लागेल. उत्तर प्रदेशसारख्या बलाढय़ राज्यांत प्रियंका गांधी यांनी एक नवा डाव टाकला आहे, पण येथील मुसलमान व दलित अखिलेश यादव, मायावतींना साथ देतो तर उच्चवर्णीय भाजपच्या हिंदुत्ववादाच्या थाळय़ा वाजवतो ही वस्तुस्थिती आहेच. कधी काळी देशात मुसलमान, दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे. भाजप त्याचेच ‘खात’ आहे. अशा परिस्थितीत विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला आहे. गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करून त्यांनी चर्चा सुरू केली. हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे ते म्हणाले; पण देश हिंदूंचा आहे हा विचार त्यांनी पुन्हा घासून पुसून वर आणला आहे. घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच आहे!”

Saamana Editorial Criticizing Congress Rahul Gandhi On Hindu And Hindutwa

सामनाचा संपूर्ण अग्रलेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
https://www.saamana.com/saamana-editorial-on-rahul-gandhi-statement-about-hindu/

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था