परमवीरसिंग पुन्हा हायकोर्टात : याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणि राज्य सरकार सूडबुद्धीने गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि ठाकरे-पवार सरकारविरुद्ध बिगुल फुंकणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीरसिंह पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी या नव्या याचिकेत दोन महत्वाचे आरोप केले आहेत. एक म्हणजे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्धचे पत्र मागे घेण्यासाठी पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दबाव आणला आहे आणि दुसरे म्हणजे, राज्य सरकार सूडबुद्धीने आपल्याविरूद्ध लागोपाठ गुन्हे दाखल करीत आहे. त्यामुळे या घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ४ मे रोजी न्यायाधीश एस.एस. शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्यासमोर होणार आहे. Parambirsingh moves Bombay HC seeking CBI probe into State govts attempts to frame him

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रूपयांची वसुली करण्याचा आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमवीरसिंह यांनी केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता. परिणामी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.मात्र, त्यानंतर राज्य सरकारने आपल्याला दातात धरले असून सूडबुद्धीने गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप परमवीरसिंह यांनी केला आहे. मुंबईतील निलंबित पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांची चौकशी कऱण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यापाठोपाठ अकोला येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनीही परमवीरसिंह यांच्याविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा नुकताच नोंदविला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे आणि ठाकरे – पवार सरकारविरोधात अनेक गंभीर तक्रारी केल्या आहेत.

परमवीरसिंह यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावरही आरोप केले आहेत. १५ एप्रिलरोजी झालेल्या चर्चेमध्ये पांडे यांनी आपल्यावर आरोपांचे पत्र मागे घेण्यासाठी दबाव आणला. सरकार म्हणजे सिस्टमविरुद्ध कोणीही कधीही जिंकू शकत नाही. तुम्ही पत्र मागे घ्या, मी सरकारला सांगून तुमच्याविरोधातील चौकशा आणि गुन्हे थांबवितो, असे पांडे यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा या नव्या याचिकेत परमवीरसिंह यांनी केला आहे.

Parambirsingh moves Bombay HC seeking CBI probe into State govts attempts to frame him

महत्त्वाच्या बातम्या