ओबीसी एम्पिरिकल डाटा : फडणवीसांच्या शंकेला भुजबळ, वडेट्टीवार यांचा दुजोरा!!; प्रकरणाचे नेमके गंभीर्य काय??

नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडून राज्याच्या राजकारणात ओबीसी एम्पिरिकल डेटाचा विषय ऐरणीवर आणला आहे. OBC empirical data BhujbalVadettiwar confirm Fadnavis suspicions

ओबीसी एम्पिरिकल डाटा गोळा करताना फक्त एकाच आडनावावरून ओबीसी समाज आणि जात नोंदणी करण्याचा हा गंभीर विषय आहे.

सध्या ओबीसी एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम राज्य शासनाची यंत्रणा गावागावांमध्ये करत आहे. परंतु अनेक ठिकाणी ओबीसींची लोकसंख्या प्रत्यक्ष जास्त असलेल्या ठिकाणी कमी लोकसंख्येची नोंद होत आहे. अशी माहिती आपल्याकडे आहे, असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. याचे गंभीर दुष्पपरिणाम ओबीसी आरक्षण आणि आरक्षणा संदर्भातल्या इतर याचिकांवर होतील, असा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे. एम्पिरिकल डाटा गोळा करताना राज्य सरकारी यंत्रणांनी पुरेशी काळजी घेऊन विविध निकषांच्या आधारे हा डाटा गोळा करावा अशी मागणी फडणवीस यांनी करून राज्य शासनाच्या यंत्रणेच्या मोठ्या उणीवेवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. 

– एकच आडनाव अनेक जाती

फक्त आडनावावरून जात ओळखणे कठीण आहे. एकाच आडनावाची माणसे विविध जातींची असू शकतात, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार या दोन मंत्र्यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याला दुजोराच दिला आहे.

– ग्रामपंचायत व्हेरिफिकेशन हवे

फडणवीस यांच्या सूचनेनुसार एम्पिरिकल डाटा गोळा करताना सुधारणा करता येतील. स्वतः मुख्यमंत्री यात लक्ष घालतील, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे, तर ओबीसी समाजाची जनगणना करताना अधिक काळजी घेऊ. संबंधित व्यक्तीने एम्पिरिकल डाटाचा फॉर्म भरताना विशिष्ट जात सांगितली तरी त्याचे व्हेरिफिकेशन ग्रामपंचायत नोंदणी आणि अन्य डाटाच्या आधारे केले जाईल. हे पहावे लागेल, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

– सखोल राजकीय अर्थ आणि मराठा समाज

या सगळ्याचा सखोल राजकीय अर्थ आहे. मध्यंतरी मराठा आरक्षणा संदर्भात मोर्चे काढणाऱ्या विविध संघटनांची मराठा समाजाला ओबीसी समाजात स्थान देऊन आरक्षण द्या, अशी मागणी पुढे केली होती. ओबीसी एम्पिरिकल डाटा गोळा करताना या मागणीचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. गावागावात ओबीसी समाजाच्या जात नोंदी होत आहेत. त्या अचूकपणे होण्याशी त्याचा संबंध आहे.

मराठा समाजाची नोंदणी असताना त्या व्यक्तींचा अथवा समूहाचा ओबीसी समाजात समावेश होऊ नये, अशी अपेक्षा आहे. तसेच अन्य कोणत्याही समाजावर विशिष्ट नोंदणीतून अन्याय होऊ नये हे देखील पाहिले पाहिजे, अशी सूचना या तिन्ही नेत्यांनी केल्याचे दिसून येत आहे.

– डाटा चुकीचा आल्यास…

ओबीसी एम्पिरिकल डाटा चुकीचा आला तर ओबीसी समाजाची लोकसंख्या प्रत्यक्षातल्या पेक्षा कमी भरून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर कायमचा दुष्परिणाम होऊ शकतो. तसेच अन्य समाजाच्या आरक्षणावर देखील दुष्परिणाम होऊ शकतो. ही गंभीर बाब देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात आणून दिली आणि या बाबीला छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला आहे. यातून राज्याच्या दृष्टीने राजकारणाला वेगळे वळण लागू शकते. एवढे गंभीर राजकीय पोटेन्शियल एम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या प्रकरणात आहे!!

OBC empirical data BhujbalVadettiwar confirm Fadnavis suspicions

महत्वाच्या बातम्या