विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कोल्हापुरातील शाहूपुरीत चक्क भर रस्त्यात उभ्या उभ्या एकमेकांना भेटले. ही भेट अगदी काही मिनिटांसाठीच झाली; पण अनेक अर्थांनी ती महत्वपूर्ण ठरली. फडणवीस यांना थांबण्याची विनंती खुद्द ठाकरे यांनीच केली, हे यात आणखी महत्वाचे.It welcoming that CM Thackeray comes forward & meet Fadnavis
महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका विचित्र कालखंडातून जात आहे. ज्या भारतीय जनता पक्षाच्या पदरात सर्सामान्य जनतेने प्रेमाने मतांचं भरघोस माप टाकलं, त्या पक्षावर चक्क विरोधात बसण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत संख्याबळाला कमालीचं महत्व असते आणि नेमकं त्यातच भाजप कमी पडला.
शिवसेना व अन्य दोन कॉंग्रेसनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. लोकशाहीची ही एक प्रकारे थट्टा आहे असे कोणी म्हणेलही. त्यात तथ्यही आहे. कारण ज्यांना लोकांनी नाकारलं तेच सत्तेत विराजमान झाले. हा एकप्रकारे मतदारांचा केलेला विश्वासघातच. पण सत्तेत नंबर गेमला महत्व असते.
या साऱ्या राजकारणातील कुरघोड्यामुळे भाजप व शिवसेनेत कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे हे कोणीच नाकारणार नाही. अनेक वर्षे एकत्र काम केलेले ठाकरे – फडणवीस गेली दीड पावणेदोन वर्षे एकमेकांसमोर बाह्या सरसावून उभे ठाकल्याचे सारा महाराष्ट्र पाहतो आहे.
विधानसभेत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला घेरण्याची एकही संधी सोडलेली नाही. प्रबळ विरोधी पक्षनेते म्हणून खांद्यावर पडलेली जबाबदारी फडणवीस चोखपणे बजावित आहेत. तर मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची ठाकरे यांची शिकस्त सुरु आहे. यात ते यशस्वी होतील की नाही हे काळच ठरवेल.
पण सध्या मात्र राज्यावर महापुराचे नैसर्गिक संकट ओढवले आहे. या महापुराची पाहणी करण्यासाठी ठाकरे व फडणवीस दोघेही एकाच दिवशी कोल्हापुरला यावेत हा योगायोगच म्हणावा लागेल. आपत्तीत राजकारण न करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे.
त्यामुळे फडणवीस पाहणी करत आहेत त्याच भागात आपण जाणार आहोत हे कळताच ठाकरे यांनी स्वतः त्यांना थांबण्याची विनंती मिलींद नार्वेकरांकरवी केली. एकूणच राजकीय संवाद साधण्याच्या बाबतीत ठाकरे यांचा इतिहास आणि पद्धत फारशी चांगली नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. याबाबतीत त्यांचा अबोल स्वभाव त्यांच्या नेहमी कामी येतो. त्यामुळे संवाद साधण्याबाबत त्यांची काही ख्याती नाही.
या साऱ्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत फडणविसांशी संवाद साधण्याला वेगळे महत्व आहे. यात कितीही राजकारण आणायचे नाही म्हटले ते आणले जाणार. पण नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते एकत्र येतात असे चित्र देशात जाणे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला साजेसे असेच आहे.
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो याचा अनुभव तसेही महाराष्ट्र सध्या रोज घेतोच आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला हे एका अर्थाने बरंच झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात येवू पहात असलेली कटूता तरी यातून कमी होण्यास मदत होईल हे नक्की….
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App