प्रतिनिधी
मुंबई : पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.Good news for police personnel Chief Minister Eknath Shinde directed the administration to prepare a plan for police houses
पोलिस गृहनिर्माणसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, बृहन्मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, प्रधान सचिव (गृहनिर्माण) मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (नगरविकास) सोनिया सेठी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, सध्याच्या स्थितीत राज्यातील पोलिस मोठ्या प्रमाणात घरापासून वंचित आहेत. त्यांना घरे मिळवून द्यायचे असल्यास तेवढ्या मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठीच लघु, मध्यम व दीर्घ कालावधी असे तीन टप्प्यात काम करण्यासाठीचे नियोजन करण्यात यावे. हा सर्वंकष स्वरुपाचा आराखडा तयार करताना भाडेतत्त्वावर (रेंटल), शहरी जमीन कमाल मर्यादा (यूएलसी) अंतर्गत इतर शहरांतील पोलिस गृहनिर्माणासाठी आरक्षित भूखंडावरील प्रकल्प यांसह एसटी महामंडळाचे भूखंड विकसित करून त्या बदल्यात घरे उपलब्ध करून घेता येतील अशा विविध पर्यायांचा विचार करण्यात यावा. पोलिस गृहनिर्माण योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच निधी उपलब्ध करण्याकरिता विविध पर्यायांचाही विचार केला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांच्या घराच्या कामांना गती द्या : फडणवीस
पोलिस गृहनिर्माणच्या माध्यमातून पोलिस स्टेशन आणि पोलिसांच्या शासकीय निवासस्थानांची उत्कृष्ट आणि दर्जेदार निर्मिती करण्यात येत आहे. या कामांना गती देण्याची गरज आहे. यासाठी कालमर्यादा निश्चित करून प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App