विशेष प्रतिनिधी
नाशिक : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेनंतर मालेगावात दंगल झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी अक्षरशः सगळ्या मालेगावला वेठीला धरले, असा गंभीर आरोप मालेगाव दंगलीतील संशयित फरारी आरोपी नगरसेवक मुस्तकीन डिग्निटी याने पत्रकार परिषद घेऊन केला आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर तो पोलिसांना शरण आला आहे. पण याच पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिसांवरही आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मुख्य म्हणजे मुस्तकीन डिग्निटी हा जनता दलाचे माजी आमदार आणि माजी मंत्री निहाल अहमद यांचा जावई आहे. त्रिपुरातील घटनेनंतर मालेगाव बंद पुकारण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग होता. परंतु त्याबद्दल च्या एफआयआरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे नाव नाही. पोलिसांवर दबाव आणून ही नावे वगळली, असा आरोपही त्याने केला आहे.
स्वतःच्या पक्षाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संपूर्ण शहराला टार्गेट केले, असा आरोप त्याने केला. विशेष म्हणजे अजूनही या दंगलीतील 16 जण फरार आहेत. संशयित आरोपी शरण घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत आहे, याचा साधा सुगावाही गाफिल पोलीस यंत्रणेला नव्हता. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दंगली उसळल्या. त्यात मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे. दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
डिग्निटी घटनेनंतर महिनाभर फरार होता. त्यानंतर त्याची पत्नी आणि मालेगाव महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद यांनी अचानक त्यांच्या घरी एक पत्रकार परिषद बोलावली. यावेळी डिग्निटी समोर आला. त्याने मालेगावातली दंगल एक पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला. महापालिकेतील भ्रष्ट कामांची कोट्यवधींची बिले तक्रार केल्यामुळे अडकली आहेत. त्यामुळे या हिंसाचारात आपल्यावर हल्ला करण्याचा कट होता, असा आरोप त्याने केला. याप्रकरणी एमआयएम, जनता दल यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. त्यांचा फिर्यादीत कसा काय उल्लेख नाही?, असा सवाल त्याने केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नावे येऊ नयेत म्हणून पोलिसांवर दबाव होता, असाही आरोप त्याने केला. या पत्रकार परिषदेनंतर दुचाकीसह शहरातून पोलिस ठाण्यात हजर झाला. मुस्तकीन डिग्निटीच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा मालेगाव दंगलीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App