अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशा सूचना राज ठाकरे आणि शरद पवार यांनी करताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला दिला आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढून शरद पवारांचे आभार मानताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन आणि शरद पवार यांनी कशी भर घातली त्याचे वर्णन केले आहे. शरद पवारांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंडे घराण्यातील व्यक्तीसाठी निवडणूक बिनविरोध करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचा उल्लेखही केला आहे. Byelections : voters didn’t necessarily supported candidates only on sympathy issue

पण राज ठाकरे आणि शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हा झाला एक भाग. याचा दुसरा भागही आहे किंबहुना तो समोरचा अथवा विरोधी भाग देखील म्हणता येईल आणि त्यासाठी फार जुन्या इतिहासात डोकवायची गरज नाही. 2011 मध्ये मनसेचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांचे निधन झाले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार मनसेच्या वांजळे घराण्यातील दुसऱ्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे इष्ट ठरले असते.

पण त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे, ज्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या, त्यांना काँग्रेस म्हणून राष्ट्रवादीमध्ये आणत उमेदवारी दिली होती. इतकेच नाही तर त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे हेच त्यांना उमेदवारी देऊ इच्छित होते. पण राष्ट्रवादीने त्यांना मनसेची उमेदवारी घेऊ दिली नाही, तर आपल्या पक्षात खेचून खडकवासल्यातून उमेदवारी दिली. पण खडकवासल्याच्या मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा पराभव करून भाजपच्या भीमराव तापकीरांच्या पारड्यात कौल टाकला. भीमराव तापकीरांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवून रमेश वांजळे यांच्या पत्नीचा पराभव केला होता.



याची पुनरावृत्ती 2021 मध्ये पंढरपूर मध्ये झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्याच भारत भालकेंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पण जनतेने मात्र समाधान आवताडे यांच्या पारड्यात कौल टाकत भगीरथ भालके यांचा पराभव घडवून आणला होता. आता जेव्हा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटकेंची निवडणूक बिनविरोध करण्याचे राजकीय तर्क देऊन प्रयत्न केले जात आहेत, तेव्हा महाराष्ट्रात घराण्याच्या वारसदारांना जनतेने प्रत्येक वेळी कौल दिला नव्हता, हा मुद्दा ही महत्त्वाचा असल्याचे लक्षात घेतले पाहिजे.

अंधेरीतली समीकरणे वेगळी

अंधेरीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेवटचा दिवस आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी जर उमेदवारी मागे घेतली, तर कदाचित निवडणूक टळेलही पण यामागे राजकीय संस्कृतीपेक्षा स्थानिक समीकरणे महत्त्वाचे असतील का?, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या पोटनिवडणुकीचे वेगळे रहस्य उघड केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे काम करायला नकार दिला आहे. याचा प्रतिकूल परिणाम ऋतुजा लटकेच्या मतांवर होऊ शकतो. शिवाय सहानुभूतीची लाट काम करेलच, याची कुठलीही गॅरेंटी नाही. अशावेळी आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवून ही निवडणूकच बिनविरोध केली की सगळ्याच पक्षांच्या ते पथ्यावर पडेल, असा या मागचा राजकीय होरा आहे. त्यातही सत्ता गमावलेल्या महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल चालू आहे हे दाखवता येईल, असाही या नेत्यांचा राजकीय होरा दिसतो आहे.

Byelections : voters didn’t necessarily supported candidates only on sympathy issue

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात