वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोना होऊनही सर्व पोलिस कर्मचारी ठणठणीत बरे झाले आहेत. एका तुलनात्मक विश्लेषणातून ही बाब पुढे आली. त्यामुळे लस घेणे फायदेशीर असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. After taking two doses of the vaccine, the corona policeman recovered
नगर जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे नुकतेच अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी तुलनात्मक विश्लेषण केले. गेल्या चार महिन्यांत एकही डोस न घेतलेल्या कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 260 आहे. त्यापैकी 165 जण घरीच उपचार घेत बरे झाले, तर 95 जणांना रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची गरज भासली. त्यातील आठजणांना ऑक्सिजनवर तर पाचजणांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. यापैकी 3 जण मयत झाले.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 59 जण बाधित झाले. त्यापैकी 33 जणांवर घरीच उपचार केले, तर 26 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. त्यातील तीनजणांना ऑक्सिजनची गरज भासली, तर एकजण व्हेंटिलेटरवर होता. पहिला डोस घेतल्यानंतर बाधित झालेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला.
लसीचे दोनही डोस घेतल्यानंतर जिह्यातील 72 अधिकारी व कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. यापैकी 55 जण घरीच राहून उपचार घेत बरे झाले, तर 17 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. यापैकी अवघ्या एकालाच ऑक्सिजनची आवश्यकता भासली. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बाधित होऊन एकाचाही मृत्यू झाला नाही.
बाधित झालेल्या पोलिसांपैकी ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांचे घरीच राहून उपचार घेत बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. लस न घेता कोरोना झालेल्या 95 जणांमध्ये 18 ते 40 वयोगटातील पोलिसांचे प्रमाण 65 टक्के आहे, तर 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे प्रमाण हे 35 टक्के आहे. लस घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या 26 पोलिसांपैकी 18 ते 40 वयोगटातील पोलिसांचे प्रमाणे 57 टक्के, तर 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे प्रमाण हे 43 टक्के आहे.
याशिवाय दोन डोस घेतल्यानंतर बाधित झालेल्या पोलिसांमध्ये 18 ते 40 वयोगटातील पोलिसांचे प्रमाण हे 59 टक्के आहे, तर 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे प्रमाण 41 टक्के आहे. दोन डोस घेतल्यानंतर बाधित झालेल्या पोलिसांमध्ये 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामानाने 40च्या आतील पोलिसांचे प्रमाण कमी आहे.
दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यूचे प्रमाण घटले
प्रतिबंधात्मक लस न घेतलेले 260 पोलिस बाधित झाले होते. त्यातील तीनजण मृत्युमुखी पडले आहेत, तर पहिला डोस घेतल्यानंतर 59 पोलिस कर्मचारी बाधित झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोन्ही डोस घेतल्यानंतर 72 कर्मचारी बाधित झाले होते. त्यापैकी कुणाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्या पोलिसांचे मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App