Adani saga : आधी श्रीमंतांच्या यादीत होते फक्त बिर्ला आणि टाटा; पण नंतर अदानींच्या वाटचालीत पवारांचाही वाटा!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीच्या अहवालानंतर अदानी समूह वेगवेगळ्या राजकीय आणि आर्थिक अडचणीत सापडला असताना देशभरात “राइज ऑफ अदानी”ची चर्चा आहे. अदानी आणि मोदी संबंधांची गेल्या पाच वर्षात वाढती चर्चा आहे. अदानी उद्योग समूहाचा वाढता प्रभाव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध विरोधकांच्या हाताला लागलेले सर्वात प्रभावी हत्यार आहे. पण अदानी – मोदी संबंधांची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी ‘राईज ऑफ अदानी” किंवा “अदानी सागा”मध्ये विरोधक देखील मागे नाहीत. किंबहुना आजचे विरोधक जेव्हा कालचे सत्ताधारी होते, त्यांचाही अदानींच्या वाटचालीत मोठा वाटा राहिला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या व्यवहारांची संसदीय समितीकडून चौकशीची मागणी जरी काँग्रेस नेत्यांनी केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या विषयी मौन बाळगले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण पवारांचे हे मौन आजचे नाही. कारण अदानींसह सर्व उद्योगपतींच्या वाटचालीत शरद पवारांचा विशिष्ट वाटा राहिलाच आहे. आज गौतम अदानी समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्यामुळे पवारांचे मौन विशेषत्वाने ठळक जाणवते इतकेच!! पण अदानी असो की मल्ल्या यांच्या उद्योगपतींच्या वाटचालीत केव्हा ना केव्हा पवारांचा वाटा राहिलाच आहे!!

– पवार – अदानी जुने संबंध

गौतम अदानींच्या सुरुवातीच्या काळात पवारांनीच त्यांना विविध उद्योग क्षेत्रात विशेषत: ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सूचविले होते. याचा उल्लेख पवारांचे आत्मचरित्र “लोक माझे सांगाती”मध्ये सविस्तर आला आहे. इतकेच नाही तर पवारांचे निवासस्थान 6, जनपथ, नवी दिल्ली असो अथवा बारामतीतले गोविंद बाग, अदानींचा वावर तिथे नित्यनेमाने आणि सहज राहिला आहे. शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतल्या राजीव गांधी विज्ञान केंद्राच्या उद्घाटन समारंभात अदानी – पवार संबंधांवर सविस्तर भाष्य केले होते. गौतम अदानींचे शरद पवारांचे 25 वर्षांपूर्वीपासूनचे संबंध आहेत. शून्यातून वर येऊन त्यांनी उद्योगाचे साम्राज्य उभे केले. ते दर दिवाळीत पवारांना भेटायला बारामतीत नेहमी येतात, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली होती. इतकेच नाही तर बारामतीच्या कार्यक्रमात विमानतळापासून प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी आणण्यापर्यंत अदानींच्या अलिशान गाडीचे सारथ्य आमदार रोहित पवार यांनी केले होते.

– पवार – अदानी गुप्त भेटी

अदानी आणि पवारांच्या दिल्लीतल्या आणि बारामतीतल्या भेटी या उघड होत्या. पण याखेरीज दोघांनाही सार्वजनिक रित्या याची बातमी व्हायला नको होती, पण त्याची बातमी झाली, अशा या दोघांच्या अनेक गुप्त भेटी या झाल्या आहेत.

 

प्रफुल्ल पटेल अडचणीत आल्यानंतरच्या भेटी

पवार केंद्रीय कृषिमंत्री होते, तेव्हा अदानींना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एफसीआयचे भले मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट कायम राहावे यासाठी पवारांनी अदानींसाठी थेट लॉबिंग केल्याच्या बातम्या देखील मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. इतकेच नाही, तर प्रफुल्ल पटेल जेव्हा डी कंपनीचा म्होरक्या इक्बाल मिर्चीशी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अडचणीत आले होते, तेव्हा पवार आणि प्रफुल पटेल गौतम अदानींना भेटायला गुजरात मध्ये त्यांच्या घरी चार्टर्ड प्लेनने गुप्तरित्या गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिथे त्यांची अदानींच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या बातमीचा अमित शाहांनी तेव्हा इन्कार केला नव्हता, पण पवारांनी त्याविषयी अद्याप मौन बाळगले आहे.

– अदानींसाठी पवारांचे लॉबिंग

2014 च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केंद्रात मोदींचे पूर्ण बहुमताचे सरकार आले. त्यावेळी शरद पवारांनी थेट गौतम अदानींसाठी लॉबिंन केल्याच्या बातम्या आल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अदानींना खुश करतानाच मोदींनाही खुश करण्याची पवारांची खेळी खेळल्याचे त्यावेळी मानले गेले.

सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानी यांनी खास हजेरी लावली होती. मोदींशी अदानींची जवळीक आणि पवारांचे मोदींशी उत्तम राजकीय संबंध लक्षात घेता या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी – पवार यांच्यात गुप्त समझोता झाल्याची टीका होत होती. त्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा पुढाकार चर्चेचा विषय ठरला होता.

– राजस्थानात गुप्त भेट

अदानी आणि पवारांच्या गुप्त भेटी झाल्याच्या आणखीही बातम्या आल्या होत्या. अशीच एक भेट राजस्थान मध्ये झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पवार त्यावेळी राजस्थान खासगी दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी गौतम आदानी यांच्याबरोबर देलवाडा मधील जैन मंदिर पाहिले. पण या दौऱ्यात माध्यमांपासून ते स्शतःहून दूर राहिले. जैन मंदिर पाहिल्यानंतर पवार ओरिया गावातील एका खाजगी निवासस्थानात पोहोचले. तेथे त्यांनी दिवसभर गौतम आदानी यांच्याशी बंद खोली चर्चा केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

– जैन व्यापारी संमेलनात उघड स्तुती

त्याआधी जैन समुदायाच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात पवारांनी गौतम अदानी यांची तोंड भरून स्तुती केली होती. गौतम अदानी हे आपले अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. शून्यातून सुरुवात करून गौतम अदानी हे देशाच्या विकासात मोलाचे योगदान देण्याइतपत मोठे व्यावसायिक आणि उद्योगपती झाले असल्याची प्रशंसा पवारांनी केली होती. आत्तापर्यंत देशात फक्त टाटा, बिर्ला अशी श्रीमंत उद्योगपतींची नावे ऐकून येत होती. पण त्यामध्ये आता जैन समुदायातले गौतम अदानी हे नाव हे अग्रगण्य झाले आहे, अशी स्तुती पवारांनी केली होती. देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात अदानींचे योगदान खूप अनमोल आहे. जिथे पायाभूत सुविधांची चर्चा होते तिथे अदानींचे नाव येते, अशी प्रशंसा देखील पवारांनी केली होती.

– काँग्रेस नेत्यांची अस्वस्थता

अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत, जिथे पवारांचे गौतम अदानी यांच्याशी उघड आणि गुप्त संबंध आले. काँग्रेसच्या नेत्यांनी अदानी समूहाच्या व्यवहारांची संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी मौन बाळगल्याने काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत. पण ही अस्वस्थता देखील जुनीच आहे. कारण पवारांनी अदानींसाठी लॉबिंग केल्याच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा देखील त्या वेळी नुकतेच विरोधी पक्षात गेलेल्या काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाल्याच्याही बातम्या आल्या होत्याच.

आता जेव्हा गौतम अदानी यांचा समूह विविध राजकीय आणि आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यावेळी पवार – अदानी संबंध कसे वळण घेतात आणि ते कसे उपयोगी ठरतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Adani saga : sharad Pawar has sweet and deep relations with gautam adani from the past 25 years

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”