दीव नगर परिषदेतले 7 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये!!; 15 वर्षांची सत्ता समाप्त!!

प्रतिनिधी

दीव : केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीतील दीव नगर परिषदतले 7 काँग्रेस नगरसेवक भाजप मध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे दीव नगर परिषदेतली काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. 7 Congress corporators from BJP in Diu Municipal Council

दादरा नगर हवेली तसेच दीव नगर परिषद नेहमीच तिथले प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात चर्चेत असते. काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांना हटविण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र दीव नगरपरिषदेच्या निवडणुकीला एक महिना उरला असता तेथे मोठी राजकीय खळबळ होऊन काँग्रेसचे 9 पैकी 7 नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये दीव नगर परिषदेचे निलंबित अध्यक्ष हितेश सोलंकी यांचे पुतणे रवींद्र सोलंकी यांचा देखील आहे.

दीव येथे आयोजित केलेल्या एका समारंभात नगरसेवक हरीश कपाडिया, दिनेश कपाडिया, रवींद्र सोलंकी रंजन राजू वानकर, भाग्यवंती सोलंकी, भावगंगा दुधमाल आणि निकिता शहा या नगरसेवकांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि दादरा नगर हवेली दमण दीवच्या प्रभारी विजया रहाटकर यांनी या सर्व नगरसेवकांचे भाजपमध्ये स्वागत केले आहे. नगरसेविका भाग्यवंती सोलंकी सध्या आजारी आहेत. परंतु त्यांचे पती चुनीलाल सोलंकी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

– भाजपच्या संघटनात्मक बळात वाढ

दीव नगरपरिषदेच्या येत्या महिन्याभरात निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर 7 नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपचे संघटनात्मक बळ वाढले आहे. या 7 नगरसेवकांना बरोबर त्यांचे समर्थक आणि भाजपमध्ये सामील झाले आहेत.

काँग्रेसने 15 वर्षांच्या आपल्या राजवटीत आणि कारभारात दीवच्या जनतेचे समाधान केले नाही. अनेक समस्या तशाच रेंगाळत ठेवल्या. त्यामुळे त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक वैतागले. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची दृष्टी त्यांना भावली आहे. विकासाच्या राजकीय प्रवाहात सामील होण्याची या नगरसेवकांची भावना आहे. त्यामुळे भाजपचे संघटनात्मक बळ तर वाढेलच परंतु दीवच्या विकासाला देखील गती मिळेल, असा विश्वास विजया रहाटकर यांनी व्यक्त केला आहे.

– काँग्रेसचे नगराध्यक्ष निलंबित

दादरा नगर हवेली दमन दीवचे प्रशासन प्रफुल्ल पटेल यांनी 6 महिन्यांपूर्वी अवैध संपत्तीच्या मुद्द्यावर देव नगर परिषदेचे नगराध्यक्ष हितेश सोलंकी यांना निलंबित केले. त्यांच्याविरुद्ध सीबीआयची केस देखील सुरू आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदी राहणे अनुचित ठरवून प्रफुल्ल पटेल यांनी हितेश सोलंकींना निलंबित केले.

प्रफुल्ल पटेल गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री

प्रफुल्ल पटेल हे दादरा नगर हवेली दमन दीव प्रशासक होण्यापूर्वी गुजरात मध्ये गृहराज्यमंत्री होते. येथेच मूळात वाद आहे. प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळेच काँग्रेसने त्यांच्या प्रशासक पदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. परंतु, सीबीआयने अवैध संपत्ती संदर्भात हितेश सोलंकी यांच्यावर केस दाखल केल्यानंतर मात्र त्यांना नगराध्यक्ष पदावरून निलंबित करण्याखेरीज प्रफुल्ल पटेल यांच्या समोर पर्याय देखील उरला नव्हता. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी हितेश सोलंकी यांना नगराध्यक्ष पदावरून निलंबित केले.

– काँग्रेसचे वर्चस्व मोडीत

दीव नगरपरिषदेवर काँग्रेसचे 2007 पासून निर्विवाद वर्चस्व होते. 2017 च्या निवडणुकीत देखील त्यांनी 13 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. एका नगरसेवकांचे निधन झाले आहे. आणि आता काँग्रेसकडे फक्त एक नगरसेवक उरला आहे. नगरसेवक फोडण्यात प्रफुल्ल पटेल यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे उरलेले एकमेव नगरसेवक हितेश सोलंकी यांनी केला आहे. त्यांची नगराध्यक्ष पदावरुन निलंबित केल्याची केस गुजरात हायकोर्टात पेंडिंग आहे. तसेच दीव नगर परिषदेने त्यांचे बेकायदा हॉटेल देखील पाडले आहे. त्याविरुद्ध देशील हितेश सोलंकी कोर्टात गेले आहेत.

 

7 Congress corporators from BJP in Diu Municipal Council

महत्वाच्या बातम्या