महाराष्ट्र तब्बल 24 वर्षानंतर राजकीय संघर्षातून राज्यसभेची निवडणूक होत आहे. गेली 24 वर्षे राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणूका बिनविरोध पार पडत आल्या आहेत. 1998 मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे सरकार महाराष्ट्रात असताना राज्यसभेची निवडणूक झाली होती. त्यानंतर 2022 मध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना निवडणूक होत आहे.
– केंद्रात भाजपचे सरकार, महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री
दोन्ही वेळा केंद्रात भाजपचे सरकार आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते मुख्यमंत्रीपदावर असणे हे या निवडणुकीतले साम्य आहे. 1998 मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते, तर महाराष्ट्रात शिवसेना नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. 2022 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत.
– महाजन, दर्डा, कलमाडी विजयी
1998 मध्ये प्रमोद महाजन हे भाजपचे उमेदवार होते. ते पहिल्याच प्राधान्यक्रम मतदानामध्ये निवडून आले होते. विजय दर्डा आणि सुरेश कलमाडी हे देखील निवडून आले होते. अपक्ष विजय दर्डा हे दुसऱ्या प्राधान्यक्रमाने, तर सुरेश कलमाडी हे अपक्ष उमेदवार असतानाही तिसऱ्या प्राधान्यक्रमाने निवडून आले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे राम प्रधान यांना पराभवाचा फटका बसला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची जोरदार चर्चा होती.
– प्रधान हे यशवंतराव, पवारांचे निकटवर्तीय
शरद पवार हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. राम प्रधान प्रधान हे त्यांचे निकटवर्ती मानले जात होते. राम प्रधान हे वरिष्ठ आयएएस अधिकारी होते. केंद्रीय गृहसचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, यशवंतराव चव्हाण यांचे पीए अशी अतिवरिष्ठ पदे त्यांनी त्याआधी भूषवली होती. त्याचबरोबर केंद्रातल्या केंद्रात काँग्रेस सरकार असताना यांनी राज्यपाल पदही भूषविले होते. परंतु राम प्रधान यांच्या सारख्या मुरब्बी राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तीला क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.
– खरा संघर्ष ठाकरे – फडणवीस, पण पवार कुठेत??
2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीतल्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात लढत असली तरी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खरा त्रिकोणी संघर्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जादा मते शिवसेनेच्या उमेदवाराला देण्याचे आश्वासन शरद पवारांनी दिले आहे. मात्र अपक्ष आमदारांच्या मतदानामध्ये प्रचंड खेचाखेची सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सर्व भिस्त या अपक्ष आमदारांच्या मतांवरच आहे!!
– कलमाडी तिसऱ्या प्राधान्यक्रमाने विजयी
1998 मध्ये पवारांचे एकेकाळचे विश्वासू पण नंतरचे अपक्ष सुरेश कलमाडी तिसऱ्या प्राधान्यक्रम मतदानामध्ये निवडून आले होते. 2022 मध्ये 1998 ची पुनरावृत्ती होणार की शिवसेनेचे संजय पवार बाजी मारून जाणार हे ठरणार आहे. तसेच काँग्रेसचे दिल्लीने पाठवलेले उमेदवार इमरान प्रतापढी यांचेही भवितव्य ठरणार आहे. घोडामैदान जवळच आहे.
– संजय राऊतांचे घोडेबाजाराचे आरोप
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार सुरू आहे, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आधीच केला आहे. 1998 च्या निवडणुकीत नेमका कोणी घोडेबाजार केला हे अध्याहृत आहे. त्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हती. महाराष्ट्रातल्या अखंड काँग्रेसचे नेतृत्व शरद पवारांकडे होते. पण काँग्रेसचे उमेदवार राम प्रधान यांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसला होता ही वस्तुस्थिती आहे.
– फटका पवार महाडिक की इम्रान प्रतापगडींना??
त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत राम प्रधान यांच्यासारखा फटका संजय पवार धनंजय महाडिक की इम्रान प्रतापगडी यांच्यापैकी नेमका कोणाला बसणार?? की हे तिघेही निवडून येऊन मोठा राजकीय वजनदार उमेदवार पडणार?? याची चर्चा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App