प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने, चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. ही धमकी एका चिठ्ठीमार्फत देण्यात आली असून, याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.You will have mice; Salman Khan threatened to kill along with his father
सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान हे रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या सुरक्षा रक्षकासह वॉकिंगसाठी बॅन्डस्टॅन्ड प्रॉमीनेड वांद्रे येथे गेले होते. व्यायाम आणि वॉकिंग झाल्यानंतर ते नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी असलेल्या बेंचवर बसण्यासाठी गेले असता, त्या बेंचवर त्यांचा सुरक्षारक्षक श्रीकांत हेगिष्टे यांना एक चिठ्ठी आढळून आली. सलीम खान यांनी ती चिठ्ठी उघडून बघितली असता, त्या चिठ्ठीत सलीम खान आणि सलमान यांना उद्देशून ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, असे लिहून त्या धमकीखाली इंग्रजी मध्ये K.G.B.L.B असे लिहिले होते.
गुन्हा दाखल
चिठ्ठी कोणी ठेवली, याबाबत त्यांना काही कळू शकले नाही. मात्र या धमकीच्या चिठ्ठीमुळे घाबरलेले सलीम खान यांनी सुरक्षारक्षकासह वांद्रे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सलीम खान यांनी मला व माझा मुलगा सलमान खानला अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी तात्काळ अज्ञात व्यक्तिविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चिठ्ठी ठेवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी वांद्रे पोलिसांनी बॅन्डस्टॅन्ड प्रॉमीनेड परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यानुसार तपास करण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने सलीम खान यांच्यावर पाळत ठेवून ते सकाळी कुठे जातात कुठे बसतात याचा माग काढला असेल आणि सलीम खान येण्यापूर्वी ते बसतात त्या बेंचवर चिठ्ठी ठेवली असावी. चिठ्ठी ठेवणाऱ्याला अटक केल्यानंतर तो कोण आहे? व धमकी कशासाठी दिली हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
सलमानच्या सुरक्षेत वाढ
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागील सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गुंडाने बॉलिवूडचा दबंग सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
व्हिडिओमध्ये लॉरेन्सने जोधपूरमध्ये सलमानला मारणार असल्याचे सांगितले होते.लॉरेन्सच्या सहकारी गँगस्टरने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकीही केली होती. या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.रविवारी सकाळी सलमान खानच्या वडिलांना चिठ्ठीमार्फत देण्यात आलेल्या धमकीचा संबंध लॉरेन्स बिष्णोई गँगस्टरशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App