नाशिक : “दक्षिण – पश्चिम महाराष्ट्रात पवारांचे भाजपला धक्के”, “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी वारे फिरवले” वगैरे बातम्यांची भरमार मराठी माध्यमांमधून सुरू आहे, पण अगदी पवारांनी भाजप आणि शिवसेनेला दिलेले धक्के, अजितदादांच्या राष्ट्रवादीशी त्यांची असलेली सुरू असलेली नुरा कुस्ती यातून दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्र विधानसभेच्या जागा नेमक्या जिंकणार तरी किती??, असा सवाल तयार झाला आहे.
कारण पवार नावाच्या फॅक्टरची महाराष्ट्रातली जादू 50 ते 60 विधानसभा मतदारसंघांमध्ये चालण्याचा इतिहास आहे. इतिहासात फक्त 2004 च्या निवडणुकीत पवार नावाच्या फॅक्टरने 71 जागा जिंकल्याची नोंद आहे. त्याआधी आणि त्यानंतर कधीही पवार नावाच्या फॅक्टरने जागांची सत्तरी गाठल्याची नोंद नाही.
त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी कितीही डाव टाकले, कितीही वारे फिरवले, तरी ते डाव टाकून टाकून किती टाकणार आणि वारे फिरवून फिरवून किती वेगाने फिरवणार आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष जागा जिंकण्यामध्ये किती होणार??, हा गंभीर सवाल आहे.
Marathwada : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, तब्बल 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार 200 कोटींचा थकित पीकविमा
काका – पुतण्यांचे सिग्नल
त्यातही शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात खरा संघर्ष असल्याचे त्यांचेच कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षक दोन्हीही मानायला तयार नाहीत. काका – पुतण्यांमध्ये जी आहे, ती नुरा कुस्तीच आहे, असे “सिग्नल” दोघेही देतात आणि त्यांचे नेते कार्यकर्ते तो “सिग्नल” मानूनच काम करतात. म्हणूनच पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या सगळ्या राजकीय हालचाली या “ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात” अशा स्वरूपाने चालतात. पवार आपलेच जुने समर्थक नेते, कार्यकर्ते गोळा करून आपल्या राष्ट्रवादीत आणतात आणि त्याच बातम्या “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी वारे फिरवले” म्हणून माध्यमांमध्ये फिरतात. त्या पलीकडे पवारांनी नवी कुठली राजकीय मुशाफिरी करण्याची बातमी नसते.
जुनेच 10 समर्थक पवारांच्या गोटात
दक्षिण – पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी आत्तापर्यंत 10 नेते पटवून आपल्या गोटात आणल्याची बातमी आहे, पण त्यातून पवारांच्या पक्षाचा फार मोठा विस्तार झाल्याची वस्तूस्थिती नसून पवारांच्या बाहूंमध्ये जुनेच बळ भरल्याची वस्तुस्थिती आहे. कारण पवारांना आणि त्यांच्या चेल्यांना एकमेकांशिवाय पर्याय नसल्याचे ते निदर्शक आहे. त्या पलीकडे पवारांच्या पक्षाचा विस्तार होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
अशातच काका – पुतण्यांच्या नुरा कुस्तीमध्ये अगदी दोन राष्ट्रवादी लढल्या, तरी दोघे मिळून 2004 चा आकडा गाठतील की जास्तीत जास्त 2009 चा आकडा गाठून थांबतील??, हा गंभीर सवाल आहेत. कारण 2004 मध्ये 71 जागा जिंकलेली राष्ट्रवादी 2009 मध्ये 62 जागांवर आली आणि त्यानंतर राष्ट्रवादीची जी घसरगुंडी सुरू झाली, ती अजून थांबलेली नाही. 2014 मध्ये 44 आणि 2019 मध्ये 53 हा अखंड राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स होता. 2024 मध्ये दोन राष्ट्रवादी आहेत. त्यांच्यात भले नुरा कुस्ती असो की खरी कुस्ती असो, या दोन्ही राष्ट्रवादी मिळून वर उल्लेख केलेल्यांपैकी नेमका कुठला आकडा गाठतात??, यावरच पवार नावाच्या फॅक्टरचे किंवा राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे खरे यशापयश अवलंबून आहे. बाकी “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी वारे फिरवले” या करमणुकीच्या बातम्या आहेत. “पवार बुद्धी”ची माध्यमे त्या देतच राहणार आहेत.
(व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App